Satara: महावितरणने पालिकेची वीज तोडली, पालिकेने महावितरणची इमारत सील केली; महाबळेश्वरात भलतीच ‘टशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:46 IST2025-03-24T13:46:13+5:302025-03-24T13:46:44+5:30

अन् वाद निवळला..

Mahavitaran cut off the municipality's electricity, the municipality sealed the Mahavitaran building In Mahabaleshwar | Satara: महावितरणने पालिकेची वीज तोडली, पालिकेने महावितरणची इमारत सील केली; महाबळेश्वरात भलतीच ‘टशन’

Satara: महावितरणने पालिकेची वीज तोडली, पालिकेने महावितरणची इमारत सील केली; महाबळेश्वरात भलतीच ‘टशन’

महाबळेश्वर : आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरल्याने पालिका व महावितरणने थकबाकी वसुली मोहीम हाती घेतली आहे. महाबळेश्वरातही या दोन विभागांमध्ये शुक्रवारी भलतीच ‘टशन’ पाहायला मिळाली. पालिकेने वीजबिल थकविल्याने महावितरणकडून पालिकेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर पालिकेकडून महावितरणचे कार्यालय सील करण्यात आले.

महावितरण विभागाची पालिकेकडे साधारण ४८ हजार रुपये थकबाकी आहे. तर पालिकेचे तब्बल ४८ लाखांचे वीजबिल थकले आहे. थकबाकी न भरल्याने महावितरणने चार दिवसांपूर्वी पालिकेच्या चार डिजिटल डिस्प्लेचा वीजपुरवठा बंद केला होता. तर शुक्रवारी पालिकेने या कारवाईला उत्तर म्हणून महावितरणचे कार्यालय सील केले.

यानंतर महावितरणने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारत पालिका कार्यालय, बोटक्लब, टोलनाके, एसटीपी सेंटर अशा विविध आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित केला. या कारवाईने दुखावलेल्या पालिका प्रशासनाने आधी महावितरणचा पाणीपुरवठा बंद केला, यानंतर ३३ केव्ही सब स्टेशन इमारतीचे बांधकाम विनापरवाना केले म्हणून इमारत सील करण्याची कारवाई हाती घेतली.

साधारण दोन ते तीन तास हा प्रकार सुरू होता. सर्व थकबाकी भरून देखील पालिका महावितरणचे सील काढण्यास तयार नव्हती. तर दुसरीकडे १५ लाख भरूनही महावितरण विभाग पालिकेचा वीजपुरवठा सुरू करण्यास तयार नव्हता. अखेर शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी मध्यस्थी केल्याने दोन्ही शासकीय विभागांनी सर्वसामान्य नागरिकांना याची झळ नको म्हणून एक पाऊल मागे घेतले. पालिकेकडून महावितरणचे सील काढण्यात आले तर महावितरणकडून पालिकेच्या सर्व आस्थापनांचा वीजपुरवठा पूर्ववत केला.

अन् वाद निवळला..

सब स्टेशन इमारत सील झाल्यास शहराचा वीजपुरवठा खंडित होऊ शकताे, ही खबर शहरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर नागरिकांनी पालिका व महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा वाद सामोपचाराने मार्गी लावला.

Web Title: Mahavitaran cut off the municipality's electricity, the municipality sealed the Mahavitaran building In Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.