साताऱ्यात महाविकासची वज्रमूठ, महायुतीसह ‘राजें’पुढे आव्हान!

By नितीन काळेल | Updated: November 7, 2025 19:33 IST2025-11-07T19:21:34+5:302025-11-07T19:33:21+5:30

Local Body Election: सातारकरांसाठी नवा पर्याय : नगराध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादीचा

Mahavikas Aghadi will contest together in the Satara Municipal Elections, Udayanraje and Shivendrasinhraje Bhosale will face a challenge along with the Mahayuti | साताऱ्यात महाविकासची वज्रमूठ, महायुतीसह ‘राजें’पुढे आव्हान!

साताऱ्यात महाविकासची वज्रमूठ, महायुतीसह ‘राजें’पुढे आव्हान!

नितीन काळेल

सातारा : सातारा पालिका निवडणुकीसाठी महायुती अन् मनोमिलनच्या चर्चा असतानाच आता महाविकास आघाडी एकत्र येण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल पडले आहे. यामुळे या निवडणुकीत ‘राजें’समोर जोरदार आव्हान उभे ठाकणार आहे. तसेच सातारकरांनाही आणखी एक नवा पर्याय मिळणार आहे. यामध्ये आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवारच नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरविण्यासाठी घटक पक्षांची एकजूट झाल्याचे बोलले जात आहे.

सातारा नगरपालिकेची निवडणूक आता तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. आताच्या निवडणुकीला नवनवीन कंगोरे आहेत. यापूर्वीच्या अनेक पालिका निवडणुका या नगरविकास आघाडी आणि सातारा विकास आघाडीत झाल्या. पण, अशा काळातच इतर पक्षही रिंगणात होते. मात्र, त्यांची डाळ पूर्णपणे कधीच शिजली नाही. त्यामुळे दोन्ही आघाडीतकडेच आलटून - पालटून सत्ता राहिली. आताच्या निवडणुकीत मात्र अनेक राजकीय वळणे येण्याची शक्यता आहे.

महायुतीची चर्चा, महाविकासच्या हालचाली

खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघेही भाजपमध्ये आहेत. मनोमिलन तसेच महायुतीतून इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने उमेदवारीवरून काथ्याकूट होणर आहे. पण, भाजपला पक्ष चिन्हावर ही पालिका निवडणूक व्हावी, असेच वाटते. त्यातच महायुतीतील शिंदेसेनेलाही जागा वाटपात हिस्सा हवा आहे. अशा या गुंत्यात महायुतीचे नेते चर्चेत गुरफटले आहेत. असे असतानाच दुसरीकडे मात्र, महाविकास आघाडी एकखांबी तंबू ठोकण्याच्या तयारीत आहे. यासाठी अंतर्गत जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत.

वाचा- साताऱ्यात 'पक्षचिन्ह' अन् नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अडले घोडे

सातारकरांसाठी नवा पर्याय

आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, उद्धवसेना आणि ‘मनसे’ यांनी एकत्र मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा मोठा राहणार आहे. घटक पक्षांसाठी काही जागा सोडण्यात येणार आहेत. तरीही यामध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा राष्ट्रवादीचाच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. सातारा पालिका निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जाण्याचा प्रयत्न आघाडीकडून राहणार आहे. यातून सातारकरांना नवीन पर्याय देण्याचा प्रयत्न आघाडी करणार आहे. हा पर्याय सातारकर किती स्वीकारतात हे नंतर समजेलच. पण, सध्यातरी पूर्वीच्या दोन आघाड्यांना आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोध होणार हे स्पष्ट होत आले हे नक्की आहे.

बंडखोर आघाडीचे आवतण!

साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोमिलनातून निवडणूक लढवायची ठरवली, तर इच्छुकांना थांबवणे अवघड आहे. त्यामुळे काहीजण बंडखोरी करणार आहेत. या बंडखोरातील मातब्बरांना महाविकास आघाडीचाही पर्याय राहील. आघाडीतूनही ते निवडणूक लढविण्याची अधिक शक्यता आहे.

दुरंगी की तिरंग लढत

सातारा पालिकेची निवडणूक आतापर्यंत बहुतांश वेळा दुरंगीच झालेली आहे. अपक्ष रिंगणात असले तरी त्यांची अधिक करून झळ जाणवलीच नाही. पण, आता महाविकास आघाडी एकत्र आणि ताकदीने निवडणूक लढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे दोन्ही राजेंचे मनोमिलन झाले नाही, तर तिरंगी लढत अटळ आहे. तिघांत सातारकर कोणाच्या पारड्यात वजन टाकणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Mahavikas Aghadi will contest together in the Satara Municipal Elections, Udayanraje and Shivendrasinhraje Bhosale will face a challenge along with the Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.