महाबळेश्वरचे पाॅइंटही होणार खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:36+5:302021-06-22T04:25:36+5:30

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर पर्यटकांसाठी खुले झाले, पुढील टप्प्यात येथील पॉइंटही खुले होऊ शकतात. ...

Mahabaleshwar's point will also be open | महाबळेश्वरचे पाॅइंटही होणार खुले

महाबळेश्वरचे पाॅइंटही होणार खुले

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर पर्यटकांसाठी खुले झाले, पुढील टप्प्यात येथील पॉइंटही खुले होऊ शकतात. ही शक्यता गृहीत धरून पुढील दोन दिवसांत सर्व पॉइंटची स्वच्छता करून सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीचा दर खाली आल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केला. त्यामुळे तब्बल साडेतीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाबळेश्वर पर्यटकांसाठी खुले झाले. पहिल्याच दिवशी १ हजार ५४ पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट देऊन पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला. पावसाळ्यात येणारे पर्यटक हे पॉइंट पाहण्यासाठी नव्हे तर पावसात मनसोक्त भिजण्यासाठी तसेच डोंगरावरून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी येतात. अशा हौशी पर्यटकांची येथे आता काही दिवसांतच गर्दी होण्यास सुरूवात होईल, हे आज आलेल्या पर्यटकांच्या गर्दीवरून स्पष्ट होत आहे.

पावसाळयात सुरक्षेच्या दृष्टीने महाबळेश्वरचे अनेक पॉइंट हे बंदच असतात; परंतु शहराजवळ आणि पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित असलेले काही पॉइंट हे वन विभागाच्या ताब्यात आहेत. यापैकी केट्स पॉइंट, विल्सन पॉइंट, लॉडविक पॉइंट, मुंबई पॉइंट आणि प्रसिध्द लिंगमळा धबधबा हे पॉइंट पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह हे काढणार आहेत; परंतु तत्पूर्वी सर्व पॉइंट स्वच्छतेचे काम हाती घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला संयुक्त वन व्यवस्थापन महासमितीचे अध्यक्ष विजय भिलारे, सचिव एल. डी. राऊत, तानाजी केळगणे, संजय कमलेकर, अनिल केळगणे, रमेश चोरमले, पंढरानाथ लांगी, विलास मोरे, नाना वाडेकर, संजय केळगणे, धनंजय केळगणे, संदीप भिलारे आदी उपस्थित होते.

(चौकट)

पर्यटकांची रॅपिड टेस्ट

महाबळेश्वर शहरात येणाऱ्या पर्यटकांची पाचगणी येथील दांडेघर नाक्यावर रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट घेण्यात येणार असली तरी नाक्यावर आलेल्या पर्यटकांची आॅक्सिजनची पातळी व टेम्परेचर तपासण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात हुल्लडबाज पर्यटकही येतात. अशा पर्यटकांचा इतर पर्यटकांना त्रास होऊ नये, यासाठी वन व्यवस्थापन समितीच्या वतीने सुरक्षा गार्ड नेमण्यात येणार आहे.

फोटो : २१ महाबळेश्वर

Web Title: Mahabaleshwar's point will also be open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.