लोणंदकर करणार ‘नो व्हेईकल डे’ साजरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST2021-01-03T04:37:02+5:302021-01-03T04:37:02+5:30

लोणंद : वाढत्या प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणे ...

Lonandkar to celebrate 'No Vehicle Day'! | लोणंदकर करणार ‘नो व्हेईकल डे’ साजरा!

लोणंदकर करणार ‘नो व्हेईकल डे’ साजरा!

लोणंद : वाढत्या प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी समजून शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शनिवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

लोणंद नगर पंचायत व लोणंद सायकलिंग ग्रुपतर्फे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लोणंद नगरपंचायत पटांगण ते लक्ष्मी रोड ते जुनी पेठ ते गांधी चौक ते नवी पेठ ते बाजारतळ ते राजलक्ष्मी थिएटर ते निंबोडी रस्ता ते सेंट ॲन्स स्कूल व परत त्याच मार्गाने नगरपंचायत पटांगण अशी सहा किलोमीटर सायकल रॅली आयोजित केली होती. यामध्ये १० वर्षांच्या मुलांपासून ६५ वर्षांपर्यंतच्या महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. रॅलीच्या सुरुवातीला लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके यांनी सर्वांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली व यापुढे दर शुक्रवारी लोणंदच्या नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही वाहन न वापरण्याचा निर्धार केला. दर शुक्रवारी सायकलचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प लोणंदकरांनी केला आहे.

लोणंद सायकलिंग ग्रुपचे रोहित निंबाळकर, विनय रावखंडे यांनी या रॅलीचे यशस्वी नियोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष सचिन शेळके, मुख्याधिकारी हेमंत ढोकले, लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे, नगरसेवक लक्ष्मण शेळके, सुभाष घाडगे, पुरुषोत्तम हिंगमिरे, डॉ. नितीन सावंत, राहुल घाडगे, डॉ. स्वाती शहा व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट..

नागिरकांनी ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्यास सहकार्य करावे

‘माझी वसुंधरा’ या योजनेच्या यशस्वीतेसाठी लोणंदमधील सर्व नागरिकांनी किमान दर शुक्रवारी दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर न करता पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन शेळके व मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी केले आहे.

फोटो ०२लोणंद सायकल

‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत शनिवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Lonandkar to celebrate 'No Vehicle Day'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.