साहित्यप्रेमींना संमेलनाची माहिती मिळणार एका क्लिकवर, संकेतस्थळाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:53 IST2025-12-18T19:52:19+5:302025-12-18T19:53:35+5:30
ऐतिहासिक सातारा नगरीत होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता तंत्रज्ञानाची जोड

साहित्यप्रेमींना संमेलनाची माहिती मिळणार एका क्लिकवर, संकेतस्थळाचे उद्घाटन
सातारा : ‘ऐतिहासिक सातारा नगरीत होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. संमेलनासाठी सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळामुळे जगभरातील साहित्यप्रेमींना संमेलनाची माहिती एका क्लिकवर मिळेल. शिवाय हे संमेलन जगाच्या कोनाकोपऱ्यात पोहचेल,’ असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशनतर्फे दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत शाहू स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या संमेलनासाठी सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते साताऱ्यातील एका कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले. यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, जनता बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात नंदकुमार सावंत म्हणाले, देश-परदेशातील मराठी बांधवांना सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सर्वांगीण माहिती उपलब्ध व्हावी, तसेच डिजिटल स्वरूपात दस्त ऐवजीकरण व्हावे, हा संकेतस्थळ निर्मितीचा उद्देश आहे. विनोद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सविता कारंजकर यांनी सूत्रसंचालन केले तर मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत बेबले यांनी उपस्थितांचे आभार मानले. संकेतस्थळ निर्मिती करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधींचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आला.