साताऱ्यात ३२ वर्षांनी साहित्य मेळा; पित्यानंतर पुत्र करणार सारस्वतांचे स्वागत
By नितीन काळेल | Updated: December 31, 2025 16:50 IST2025-12-31T16:49:51+5:302025-12-31T16:50:31+5:30
99th Marathi Sahitya Sammelan: उद्यापासून चार दिवस साहित्यिक, रसिक, पुस्तकप्रेमींत उत्साह

साताऱ्यात ३२ वर्षांनी साहित्य मेळा; पित्यानंतर पुत्र करणार सारस्वतांचे स्वागत
नितीन काळेल
सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी केलेले प्रयत्न फलद्रूप झाल्यामुळे ऐतिहासिक सातारा शहरात गुरुवार, दि. १ जानेवारीपासून ९९ वे संमेलन सुरू होत आहे. यामुळे चार दिवस साहित्यिक, रसिक, पुस्तकप्रेमींचा मेळा जमणार आहे. यानिमित्ताने रसिकांना विविध कार्यक्रमांचा आस्वादही घेता येईल, तर सातारा शहरात तब्बल ३२ वर्षांनी संमेलन होत असून, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे स्वागताध्यक्ष आहेत. यामुळे पित्यानंतर पुत्रालाही सारस्वतांचे स्वागत करण्याचा मान मिळाला आहे. हे या संमेलनाचे एक वैशिष्टही ठरले आहे.
सातारा जिल्ह्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने भरविण्यात नेहमीच पुढाकार घेतलाय. आता होणारे ९९ वे मराठी साहित्य संमेलन सातारा शहरातील चाैथे, तर जिल्ह्यातील ७ वे ठरणार आहे. आताच्या संमेलनाचे अध्यक्ष ‘पानिपत’कार विश्वास पाटील आहेत, तर सातारा शहरात पहिले संमेलन १९०५ मध्ये झाले होते. हे एकूणमधील तिसरे संमेलन ठरले होते.
यानंतर ५७ वर्षांनी १९६२ मध्ये साताऱ्यात ४४ वे संमेलन झाले, तर १९७५ मध्ये कऱ्हाडला ५१ वे साहित्य संमेलन झाले. १९९३ मध्ये सातारा शहरात ६६ वे संमेलन पार पडले, तर २००३ मध्ये कऱ्हाडला ७६ वे आणि २००९ मध्ये महाबळेश्वरमध्ये ८२ वे संमेलन झाले होते. असा साहित्य संमेलनाचा सातारा जिल्ह्याला वारसा लाभलेला आहे.
६६ अन् ९९ व्या संमेलन स्वागताध्यक्षांचा मान ‘राजें’ना...
१९९३ मध्ये सातारा शहरात ६६ वे संमेलन झाले. शहरातील तिसरे तर जिल्ह्यातील चाैथे संमेलन होते. ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विद्याधर गोखले संमेलनाचे अध्यक्ष होते, तर मंत्री अभयसिंहराजे भोसले हे स्वागताध्यक्ष होते. आता ३२ वर्षांनी साताऱ्यात संमेलन होत आहे. दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांचे पुत्र शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आताच्या ९९ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते मंत्रीही आहेत. हाही एक योगायोग म्हणावा लागेल.
महाबळेश्वरचे संमेलन अध्यक्षाविना...
२००९ मध्ये महाबळेश्वरला साहित्य संमेलन झाले. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव हे अध्यक्ष होते. पण, काही कारणांनी अध्यक्षाविना संमेलन पार पडले. आतापर्यंतच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासात अध्यक्षाविना पार पडलेले हे संमेलन ठरले. तशी ही घटना दुर्मीळच ठरलेली आहे.