Local Body Election: लाडक्या बहिणी रुसून बसल्या, सातारा जिल्ह्यात मतांचा टक्का घसरला
By सचिन काकडे | Updated: December 4, 2025 19:37 IST2025-12-04T19:36:53+5:302025-12-04T19:37:22+5:30
महिला मतदारांची संख्या अधिक असतानाही मतदानातील उत्साह कमी

Local Body Election: लाडक्या बहिणी रुसून बसल्या, सातारा जिल्ह्यात मतांचा टक्का घसरला
सचिन काकडे
सातारा : सातारा जिल्ह्यातील सात नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी मंगळवारी (दि. २) मतदान प्रक्रिया पार पडली. या पालिकांसाठी एकूण ६६.६९ टक्के मतदान झाले. निवडणुकीत यंदा महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असल्यामुळे महिलांची मते निर्णायक ठरतील, अशी मोठी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, मतदानाच्या आकडेवारीमध्ये याच्या उलट चित्र पाहायला मिळाले.
जिल्ह्यात एकूण १ लाख ३२ हजार ३५५ पुरुषांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर महिला मतदारांची संख्या तुलनेने कमी म्हणजे १ लाख २५ हजार ११ इतकी राहिली. या मतदानावरून लाडक्या बहिणींनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. महिलांचा मतदानाचा कल पुरुषांच्या तुलनेत कमी दिसून आल्याने, यंदा निवडणुकीचा अंतिम निकाल कसा लागतो, याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.
सातारा पालिकेसाठी सर्वात कमी मतदान
जिल्ह्यात सातारा नगरपालिकेसाठी सर्वात कमी, म्हणजेच केवळ ५८.५४ टक्के इतके मतदान झाले. येथील एकूण १ लाख ४८ हजार ३०७ मतदारांपैकी ८६ हजार ८१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यातही महिला मतदारांचा उत्साह कमीच होता. पालिकेला ४४ हजार ७४२ पुरुष तर ४२ हजार ५६ महिलांनी मतदान केले.
मेढ्यात विक्रमी मतदान
या निवडणुकीत, मेढा नगरपंचायतीसाठी सर्वाधिक ८४.२३ टक्के मतदान झाले, तर सातारा नगरपालिकेसाठी सर्वात कमी मतदान झाले. एकंदरीत, महिला मतदारांची अधिक संख्या असतानाही मतदानातील त्यांचा सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी राहिला.
मतदानाची टक्केवारी अशी
- मेढा नगरपंचायत ८४.२३ (सर्वाधिक)
- रहिमतपूर ८१.२०
- म्हसवड ७९.८५
- पाचगणी ७७.४५
- वाई ७२.९८
- कराड ६९.९१
- मलकापूर ६८.०५
- सातारा ५८.५४ (सर्वात कमी)
- पुरुष मतदार - १,६८,४१०
- महिला मतदार - १,७२,०१०
- झालेले मतदान
- पुरुष - १,३२,३५५
- महिला - १,२५,०११
कोणत्या पालिकेत किती मतदान
सातारा
मतदार १,४८,३०७
मतदान ८६,८१२
कराड
मतदार ६९,८३६
मतदान ४८,८२४
वाई
मतदार ३१,७६३
मतदान २३,१८२
पाचगणी
मतदार १०,२०१
मतदान ७९०१
रहिमतपूर
मतदार १५,७७०
मतदान १२,८०६
म्हसवड
मतदार २३,३५८
मतदान १८,६५१
मलकापूर
मतदान २५,१७४
मतदार १७,१३२
मेढा
मतदार ४०२६
मतदान ३३९१