पुण्यात नेत्यांकडून मोर्चेबांधणी, साताऱ्यात नेते गाफील; 'पुणे पदवीधर'साठी युवकांची ताकद संघटित करण्याची गरज
By दीपक देशमुख | Updated: December 10, 2025 18:49 IST2025-12-10T18:46:28+5:302025-12-10T18:49:12+5:30
भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू

संग्रहित छाया
दीपक देशमुख
सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त नोंदणी झाल्यास जिल्ह्यातील उमेदवाराला ताकद मिळू शकते. परंतु, या महत्त्वाच्या टप्प्यावर जिल्ह्यातील सर्व नेते उदासीन दिसत आहेत, तर पुणे जिल्ह्यातील नेतेमंडळींकडून नोंदणीच्या निमित्ताने मोर्चेबांधणी धडाक्यात सुरू आहे. हा गाफीलपणा निवडणुकीला नुकसानकारक ठरू शकत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २०२६ मध्ये होणार असून, नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. यानंतर दि. १८ डिसेंबरपर्यंत दावे, हरकती असल्याने आणखी काही दिवस नोंदणीला मिळाले आहेत. परंतु, सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, अशी राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही. जिल्ह्यातील लाखो युवक पदवीधर आहेत. त्यामुळे पदवीधर नोंदणीला आणखी वाव आहे.
कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये साताऱ्यातील इच्छुकांचा पक्षाकडून विचार होण्यासाठी जिल्ह्यातील युवकांची साथ गरजेची आहे. अन्यथा, उमेदवारी मिळवण्यात आणि प्रत्यक्षात निवडणुकीला पुणे अथवा कोल्हापूर जिल्ह्यांचाच वरचष्मा राहू शकतो.
पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ
पुणे पदवीधर मतदारसंघात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे आणि कोल्हापूर हे मोठे जिल्हे असून, राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. या मतदारसंघात २०२० मध्ये महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे या खेपेस भाजपने पुण्यात मोठी मोर्चेबांधणी केली आहे.
महाविकास आघाडीचे जि. प.वर लक्ष केंद्रित
सध्या महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाही. दोन्ही पक्षांचे लक्ष सध्या तरी जिल्हा परिषद निवडणुकांवर केंद्रित असल्याचे दिसत आहे.
भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू
- भाजपकडून गतवेळच्या पराभवातून धडा घेत पुण्यात जोरदार माेर्चेबांधणी सुरू झालेली आहे. परंतु, सातारा जिल्ह्यामध्ये काहीच हालचाल दिसून येत नाही.
- जिल्ह्यातून भाजपातील विक्रम पावसकर, अमित कुलकर्णी, धैर्यशील कदम, दत्ताजी थोरात, किशोर गोडबोले या नावांची चर्चा होत असली तरी नगरपालिका निवडणुकीवेळी युवकांपर्यंत पोहोचण्याची संधीही जिल्ह्यातून दवडली असल्याचे दिसत आहे.
- मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादीतूनही पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यानंतरच हालचाल होणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे.