टाईपरायटरचा अखेरचा श्वास ! शासनाकडून वर्षासाठी मुदत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:55 IST2017-12-12T18:49:21+5:302017-12-12T18:55:24+5:30
महाराष्ट्र परीक्षा परिषदेने टाईपरायटरला चालू वर्षापासून ब्रेक देण्याची सहमती दर्शविली होती; परंतु पुन्हा यात बदल करून नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, यामुळे शासकीय वाणिज्य टायपिंग प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना टाईपरायटर शिकावे लागणार आहे.

टाईपरायटरचा अखेरचा श्वास ! शासनाकडून वर्षासाठी मुदत वाढ
सातारा : महाराष्ट्र परीक्षा परिषदेने टाईपरायटरला चालू वर्षापासून ब्रेक देण्याची सहमती दर्शविली होती; परंतु पुन्हा यात बदल करून नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, यामुळे शासकीय वाणिज्य टायपिंग प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना टाईपरायटर शिकावे लागणार आहे.
संगणकीय क्रांतीमुळे टाईपरायटरचा वापर कमी होऊ लागला आहे, यामुळे नजीकच्या काळात टाईपरायटरची टिक-टिक बंद होणार आहे. अनेक कार्यालयांत बंद अवस्थेतील टाईपरायटरचा ढीग साठला आहे.
शासकीय कार्यालयात नोकरी मिळवण्यासाठी टायपिंगशिवाय पर्याय नव्हता, यासाठी दहावी झाल्यानंतर लगेचच टाईपरायटरचा कोर्स लावला जायचा. मागील अनेक वर्षांपासून टाईपरायटर शासकीय कार्यालयातील अभिवाज्य घटक बनला होता; परंतु संगणकामुळे आता हाच टाईपरायटर अखेरच्या घटका मोजत आहे. संगणक, प्रिंटर अशा अत्याधुनिक साधनांमुळे टाईपरायटर कालोघात बाजूला पडले आहे.
शासनाने मुदत वाढ केल्याने पुढील वर्षी प्रमाणपत्र मिळण्यासाठी टाईपरायटर टायपिंगचा क्लासचे वेळापत्रक आजही महाविद्यालयांत दिसत आहे. टाईपरायटिंग शिकायचे ते केवळ शासकीय नोकरी मिळविण्यासाठी!, अशी बेरोजगारांची धारणा आहे. साहजिकच टाईपरायटिंग शिकायचे आणि काम संगणकावर करायचे, असा प्रकार असूनही शासनाच्या कामकाजाचा विरोधाभास पुढे येताना दिसत आहे.