Satara: आंबेनळी घाटात दरड कोसळली, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग बंद; दरड हटविण्याचे काम सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:33 IST2025-07-11T11:33:11+5:302025-07-11T11:33:54+5:30

वाहतूक विस्कळीत होणार 

Landslide in Ambenali Ghat, Mahabaleshwar Poladpur road closed | Satara: आंबेनळी घाटात दरड कोसळली, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग बंद; दरड हटविण्याचे काम सुरू 

Satara: आंबेनळी घाटात दरड कोसळली, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग बंद; दरड हटविण्याचे काम सुरू 

सातारा : जिल्ह्यात पावसाची पूर्ण उघडीप असली तरी महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. यामुळे दरड हटविण्याचे काम वेगाने सुरू असलेतरी पाच दिवस मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी वाहतूक विस्कळीत होणार असल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

महाबळेश्वर-पोलादपूर हा मार्ग कोकणला जोडणारा आहे. या मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. यामुळे दरड हटविली जात आहे. परिणामी पाच दिवस मार्ग बंद राहणार असल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब करावा करावा लागणार आहे. तसेच पश्चिमेकडीलच बुरडाणी, कोट्रोशी, दोडाणी, उचाट रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली आहे. पोकलेन आणि ब्लास्टिंगच्या सहाय्याने दरड हटविण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे रस्ता बंद आहे. दरड हटविल्यानंतर रस्ता वाहतुकीस खुला होणार आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवडे धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे पश्चिम भागातील कास, तापोळा, बामणोली, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी आणि कोयना खाेऱ्यात पाऊस थांबल्यातच जमा आहे. यामुळे अनेक दिवसानंतर पश्चिम भागातील लोकांनाही सूर्यदर्शन होऊ लागले आहे. तसेच शेतीची कामे आणि भात लागणीलाही वेग येणार आहे. 

त्यातच शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तर नवजा येथे २१ आणि महाबळेश्वरला १६ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे २ हजार १५५, नवजाला १ हजार ९४८ आणि महाबळेश्वरला २ हजार १३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम भागात पावसाची उघडीप असलीतरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली असलीतरी साठा ७२.५१ टीएमसी झाला होता. सुमारे ६९ टक्के धरण भरले आहे. तर पायथा वीजगृहाची दोन युनिट सुरू असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे.

पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रातही पावसाची उघडीप आहे. तरीही धरणात पाण्याची आवक असल्याने साठा वाढू लागला आहे. तर सातारा शहरात दोन दिवसांपासून पावसाची उघडीप कायम आहे. शुक्रवारी सकाळपासून शहरात सूर्यदर्शन सुरू झाले होते. त्यामुळे तीन आठवड्यानंतर सातारकर सततच्या पावसापासून दूर झाले आहेत.

Web Title: Landslide in Ambenali Ghat, Mahabaleshwar Poladpur road closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.