पर्यटन महोत्सवादिवशीच वेण्णा तलावात स्टॉलधारकांसह जलसमाधी घेणार, कुमार शिंदेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:08 IST2025-04-29T12:07:31+5:302025-04-29T12:08:39+5:30
महाबळेश्वर : येथील वेण्णा तलाव परिसरात व्यवसाय करणाऱ्या स्थानिक स्टॉलधारकांची पुनर्वसनाची मागणी अनेक वर्षे रखडली आहे. त्यांच्या रोजी रोटीचा ...

पर्यटन महोत्सवादिवशीच वेण्णा तलावात स्टॉलधारकांसह जलसमाधी घेणार, कुमार शिंदेंचा इशारा
महाबळेश्वर : येथील वेण्णा तलाव परिसरात व्यवसाय करणाऱ्या स्थानिक स्टॉलधारकांची पुनर्वसनाची मागणी अनेक वर्षे रखडली आहे. त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न सुटत नसल्याने २८ स्टॉल धारकांसह स्वतः दि. २ मे रोजी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनादिवशी वेण्णा तलावात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शिंदे म्हणाले, महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव परिसरात हातगाड्यावर खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून उदरनिर्वाह करणाऱ्या स्टॉलधारकांवर वनविभागाने कारवाई करत स्टॉल हटवले. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत न्यायालयाने स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले. मात्र, यावर कार्यवाही न झाल्याने जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेवून स्टॉल धारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावर देसाई यांनी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्याचे सांगितले. तसेच पर्यटन महोत्सवाच्या व्यवस्थापन समितीतूनही बाहेर पडणार असल्याचे कुमार शिंदे म्हणाले.
आमदार मकरंद पाटील यांच्याकडून अन्याय
याबाबत आम्ही दोन वर्षे लढा देत असताना ना. मकरंद पाटील या विषयात राजकारण आणून स्टॉलधारकांवर अन्याय करत आहेत, असा आरोपही कुमार शिंदे यांनी केला.