‘कृष्णे’त तिरंगी लढतीचे संकेत!
By Admin | Updated: November 24, 2014 23:22 IST2014-11-24T21:13:35+5:302014-11-24T23:22:32+5:30
सभासदांमध्ये उत्सुकता : पक्षीय झेंडे की गटातटातच लढाई

‘कृष्णे’त तिरंगी लढतीचे संकेत!
कऱ्हाड : सातारा अन् सांगली जिल्ह्यातील काही तालुके कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची होवू घातलेली निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत स्पष्ट मिळत आहेत; पण ही निवडणूक तीन गटात होणार, की तीन पक्षात होणार याबाबत सभासदांच्यात उत्सूकता निर्माण झाली आहे़
‘कृष्णा’ साखर कारखान्याची निवडणूक सहा महिन्यावर येवून ठेपली आहे; पण त्याची जुळवाजुळव विधानसभा निवडणूकीपासूनच सुरू आहे़ ‘कृष्णा’ म्हटलं की, मोहिते-भोसले कुटुंबीयांचा संघर्ष अशी ओळख; पण सात वर्षांपूर्वी या दोन परिवारांचं मनोमिलन झालं, अन् या संघर्षाला पूर्णविराम मिळाला़ असं सभासदांना ‘वाटलं़’पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत हे मनोमिलन पुन्हा ‘फाटलंं’ अशी स्थिती आहे़ त्यामुळे कृष्णेत तिसऱ्या पॅनेलची चर्चा जोर धरू लागली आहे़
कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुका अन् सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव व खानापूर तालुक्यात आहे़ त्यामुळे ‘कृष्णे’च्या सत्तेचा अन् निवडणूकीचा चार ते पाच विधानसभा मतदार संघावर परिणाम होत असतो़़ विधानसभा निवडणूकीचा धुरळा नुकताच खाली बसला आहे़ अन् कारखाना निवडणूकीची तयारीही सुरू झाली आहे़ त्याचाच एक भाग म्हणून विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहितेंनी अचूक वेळ साधत गळीतहंगाम शुभारंभ बारामतीच्या अजित दादांच्या हस्ते केला़ पण त्यांच्या उपस्थितीबरोबर निमंत्रण पत्रिकेवर आमदार बाळासाहेब पाटील व विलासराव पाटील-उंडाळकर यांचे नाव असूनही ते अनुपस्थित राहिल्याचीही चर्चा सभासदांच्यात सुरु आहे़
सध्या कऱ्हाड दक्षिणेत राष्ट्रवादी सक्षम नेतृत्वाचा शोध घेत असल्याची चर्चा आहे़ पक्षाच्या स्थापनेपासून येथे अपेक्षित यश मिळाल्याचे दिसत नाही़ त्यामुळे अजितदादा, अविनाशदादांच्या हातात घड्याळ बांधण्याच्या नादात असल्याचे समजते़ परिणामी येणारी निवडणूक अविनाश मोहितेंनी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली लढवली, तर आश्चर्य वाटायला नको़ अन् हो त्याचा फायदाही अविनाश मोहितेंना होऊ शकातो़ कारण आमदार जयंत पाटील अन् आमदार बाळासाहेब पाटील यांची आपसुक मदत त्यांना मिळू शकते़ शिवाय अपक्ष असणारे उंडाळकरही त्यांनाच मदत करू शकतात़
भाजपचे कमळ हातात धरलेल्या डॉ़ सुरेश भोसले, डॉ़ अतुल भोसले यांनी पक्षिय पातळीवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी अन् भाजपच्या व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जाळ्याचा फायदा त्यांना होऊ शकतो़
तर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ़ इंद्रजित मोहिते यांनी मनोमिलनाला बगल देत काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला़ त्यामुळे मोहितेंनी स्वतंत्र पॅनेल उभे केल्यास त्यांना पृथ्वीराज चव्हाण, डॉ़ पतंगराव कदम, आमदार आनंदराव पाटील आदींची मदत मिळू शकते़
सध्यातरी मदनराव मोहिते़ यांचा सन १९८९ प्रमाणे गनिमीकावा सुरु दिसतोय़ डॉ़ इंद्रजित मोहितेंचा वर्षभरापासून संपर्क दौरा सुरूच आहे़ विधानसभा निवडणूकांनंतर भोसलेंनीही जुळवाजुळव चालविली आहे़ विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहितेही सावध पावले टाकत आहेत़ पण त्यांना संचालक मंडळातील काही जणांचा रोष अन् राजीनामानाट्याला सामोरे जावे लागत आहे़ (प्रतिनिधी)
‘रयत’, ‘सहकार’ अन् ‘संस्थापक’ पॅनेल
‘कृष्णे’च्या आजवरच्या संघर्षात दिवंगत यशवंतराव मोहिते यांचे ‘रयत’ तर जयवंतराव भोसले यांचे ‘सहकार’ पॅनेल यांच्यात मुख्य लढत होत होती़ गतवेळी मात्र मोहिते-भोसलेंचे मनोमिलन झाल्याने दिवंगत आबासाहेब मोहिते यांचा वारसा सांगत नातू अविनाश मोहिते यांनी ‘संस्थापक’ पॅनेल रिंगणात उतरवले अन् ते विजयीही झाले़ त्यामुळे या तिन्ही पॅनेलची नावे तसेच त्यांचे स्वतंत्र झेंडे सभासदांना माहित आहेत़ पण यंदा पॅनेल ऐवजी पक्षाची नावे अन् पक्षाचे झेंडे खांद्यावर घ्यावे लागणार का ? अशी चर्चा सुरु आहे़
अनुपस्थितीची
चर्चा तर होणारच !
‘कृष्णे’चा ५५ वा गळीत हंगाम शुभारंभ रविवारी ‘दादा’ माणसांच्या हस्ते झाला़ राष्ट्रवादीचे अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित होते; पण त्यांच्या बरोबर कऱ्हाड दक्षिणचे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेवर होते़ मोळी टाकण्याच्या निमित्ताने आगामी निवडणूकीची ‘मोळी बांधण्याचा’ अविनाश मोहितेंचा प्रयत्न होता; पण या दोघांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली़ त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची व आगामी निवडणूकीतील त्यांच्या भूमिकेची चर्चा सध्या सुरू आहे़
उंडाळकर, जयंंत पाटील गॉडफादर !
अविनाश मोहिते यांनी ‘कृष्णे’त ऐतिहासिक सत्तांतर केले खरे; पण गेल्या पाच वर्षात त्यांनी कुुठल्याच पक्षाचा झेंडा खांद्यावर अथवा हातातही घेतलेला नाही़ राजकारणात गॉडफादर लागतो म्हणून विलासराव पाटील-उंडाळकर व जयंत पाटील यांच्याशी संबंध मात्र ठेवले आहेत; पण यंदा कारखाना निवडणूक जिंकण्यासाठी ते रष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतील अशी परिस्थिती वर्तवली जात आहे़