सातारा : शहरात कोयता गॅंगची पुन्हा दहशत सुरू झाली असून, मोळाचा ओढा परिसरातील एका हाॅटेलमध्ये चारजणांनी कोयता उगारून दहशत निर्माण केली. तसेच हाॅटेलबाहेर उभ्या असलेल्या एका दुचाकीचीही कोयत्याने तोडफोड केली. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री अकरा वाजता घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, मोळाचा ओढा येथे एक हाॅटेल आहे. रात्री अकरा वाजल्यानंतर हाॅटेल चालकाने हाॅटेल बंद केले. त्यावेळी चार तरुण जेवणासाठी हाॅटेलमध्ये आले. वेळ झाल्याने हाॅटेल बंद केल्याचे सांगताच त्या तरुणांनी कोयता उगारून हाॅटेल चालकाच्या अंगावर धावले. प्रसंगावधान राखून हाॅटेल चालक तेथून पळून गेला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या टोळक्याने एवढ्यावरच न थांबता हाॅटेलच्या बाहेर असलेल्या एका दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. दरम्यान, हा प्रकार हाॅटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाला असून, या घटनेची सातारा शहर पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती.
साताऱ्यात कोयता गँगची पुन्हा दहशत, हॉटेलच्या पार्किंगमध्ये दुचाकीची तोडफोड
By दत्ता यादव | Updated: October 5, 2023 12:18 IST