कोयना धरणात ७४ टीएमसीवर पाणीसाठा, पश्चिम भागात पाऊस सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 14:19 IST2020-08-10T14:16:02+5:302020-08-10T14:19:05+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ५० मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

कोयना धरणात ७४ टीएमसीवर पाणीसाठा, पश्चिम भागात पाऊस सुरूच
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ५० मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, कोयना धरणात पाण्याची आवक सुरूच असून सकाळच्या सुमारास साठा ७४.२९ टीएमसी इतका झाला होता.
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा २४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयनेला २७२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा येथे सकाळपर्यंत ५० आणि यावर्षी आतापर्यंत २९७८ तसेच महाबळेश्वरला ५० व जूनपासून २९१३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा या ठिकाणी खूपच पाऊस कमी आहे. आता पावसाळ्याचे थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत. या दिवसांत येथील पाऊस वार्षिक सरासरी गाठतो की नाही ते लवकरच समजणार आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १६३१० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ७४.२९ टीएमसी इतका झाला होता. तसेच २४ तासांत धरणसाठ्यात जवळपास सव्वा टीएमसीने वाढ झाली. मागील काही दिवसांचा विचार करता कोयना धरण पाणीसाठ्यात कमी कमी वाढ होताना दिसून येत आहे.