आमदार महेश शिंदे यांचे नोटिसीला प्रत्युत्तर, समर्थक म्हणतात..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 18:04 IST2022-06-23T18:03:45+5:302022-06-23T18:04:13+5:30
आमदार महेश शिंदे हे मंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते

आमदार महेश शिंदे यांचे नोटिसीला प्रत्युत्तर, समर्थक म्हणतात..
कोरेगाव : कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहण्याचा ठाम निर्णय घेतला असून, सुरतवरून गुवाहाटीकडे विमानाने जाण्यापूर्वी विमानतळावर जय श्रीरामचा नारादेखील त्यांनी दिला. दरम्यान, शिवसेनेने आमदार महेश शिंदे यांना नोटीस काढली असून, शिवसैनिकांनी खटाव येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिली. यावेळी पोलीस कर्मचारी तेथे होते. आमदार महेश शिंदे यांनी शिवसेनेच्या नोटिसीला प्रत्युत्तर दिले असून, त्यांच्या समर्थकांनी व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवले आहेत. आमदार महेश शिंदे यांनी केले, ते योग्यच केले, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.
आमदार महेश शिंदे हे मंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मंत्रालयातदेखील त्यांचा वावर हा कायम मंत्री शिंदे यांच्या दालनामध्ये असायचा, त्यामुळे दोन्ही शिंदे हे समीकरणच झाले होते. नगरविकास मंत्रालयाने आमदार महेश शिंदे यांच्या प्रत्येक प्रस्तावावर भरभरून निधी दिला, त्यामुळे आमदार महेश शिंदे हे शेवटपर्यंत त्यांची साथ सोडणार नाहीत, असे मतदारसंघातील कार्यकर्ते आता ठामपणे सांगत आहेत.
गेले दोन दिवस कोरेगाव मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या मोबाइलवर आमदार महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअप स्टेट्स आहेत. कोरेगावातील नगरविकास आघाडीच्या सर्वच नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे यांच्याविषयी प्रेमभावना दाखवत ‘साहेब तुम्ही घ्याल, तो निर्णय... आम्हाला मान्य आहे’ असे स्पष्ट केले आहे.