सिमेंटच्या जंगलात ‘कौलारू’ घरांची पडझड

By Admin | Updated: May 8, 2015 00:19 IST2015-05-07T23:03:42+5:302015-05-08T00:19:30+5:30

शाकारणी झाली कालबाह्य : कारागिरांचा ग्रामीण भागात तुटवडा ; तुटपुंज्या मजुरीमुळे मजुरांची व्यावसायाकडे पाठ

'Kolaru' house collapse in cement forest | सिमेंटच्या जंगलात ‘कौलारू’ घरांची पडझड

सिमेंटच्या जंगलात ‘कौलारू’ घरांची पडझड

संतोष गुरव - कऱ्हाड -पावसाळा येण्यापूर्वी घरांची डागडुजी करण्याचे काम सध्या ग्रामीण तसेच शहरी भागात केले जात आहे. यामध्ये कुणी घरांचे पत्रे, तर कुणी घरावरील स्लॅबची डागडुजी करत आहेत. नव्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या घरांची डागडुजी करण्यासाठी गवंडी व इंजिनिअर मिळत आहे. मात्र जुन्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या कौलारू घरांच्या शाकारणीसाठी शाकारणी करणारे कारागिर मिळत नसल्याने ग्रामीण भागातील कौलारू घरांची शाकारणी व डागडुजीअभावी पडझड होत आहे.
पावसाळ्यात छतांतून पाणी गळू नये म्हणून कौलारू घरांना शाकारणी केली जाते. ग्रामीण भागात पूर्वी दगड अन् मातीच्या साह्याने बांधण्यात आलेल्या घरांवर घाणेरीच्या झाडापासून व ताटी लावून तयार करण्यात आलेले छप्पर घातले जात असत. त्या घरांची आजही अवस्था मजबूत स्थितीत असल्याचे पाहावयास मिळते. घाणेरीच्या झाडापासून तयार करण्यात आलेल्या छप्परावर बारीक सुपाच्या आकाराची कौले बसवण्यात आल्यानंतर घराला शोभा येत असत. त्याकाळी प्रामुख्याने सर्वत्र अशा छप्पराच्या घरांचे बांधकाम केले जात असे.
ऊन, वारा, पावसापासून बचाव करण्यासाठी बारीक सुपाच्या आकाराच्या कौलांचा वापर केला जाई. मात्र, दर चार-पाच वर्षांनी या कौलारू घरांच्या छतांची डागडुजी करावी लागत, तसेच छतावर पडलेले छिद्रे मुजविण्याचे काम केले जात असत. या कामासाठी ठराविक कारागिरांना त्या काळात जास्त मागणी असे. आता त्या काळातील कारागिरांचे वय झाल्याने त्यांचे काम करणाऱ्यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आताच्या काळातील कौलारू घरे पाडण्याचा इंजिनिअरकडून सल्ला दिला जात आहे. तर त्या जागी सिमेंट अन् विटांपासून बंगले बांधले जात आहे. सिमेंट अन् विटांपासून बांधण्यात आलेल्या घरांना खर्चही जास्त प्रमाणात लागत असल्याने पैसे जास्त मोजून इंजिनिअर यांच्याकडून बंगले बांधले जात आहे.
माती व दगडापासून बांधण्यात आलेल्या घरांची अनेकवेळा भूूकंपामुळे पडझड होते. तर त्याकाळी कारागिरांकडून बांधण्यात आलेली भूकंपरोधक इमारती आजही ग्रामीण भागात चांगल्या स्थितीत आहेत.
भूकंप असो, अथवा पावसाळा. या दिवसात टिकू न राहणाऱ्या कौलारू घरांच्या शाकारणीसाठी खर्चही कमी येतो. एक ते दोन कारागिरांकडून कौलारू घरांची शाकारणी करण्याचे काम पूर्वी के ले जात असत.
आज त्याचे प्रमाण कमी झाले आहे. जुन्या काळातील शाकारणी करणारे आज थकलेले असून, त्यांच्या पिढीतील कु णी शासकीय तर कुणी खासगी नोकरीत कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामीण लोकांचे हाल होत आहेत.


असा होता पूर्वी शाकारणीचा दर
पूर्वीच्या काळात कौलारू घरांच्या शाकारणीबरोबर दगड, मातीच्या साह्याने बांधण्यात आलेल्या घरांच्या शाकारणीसाठी शंभर ते दोनशे रूपये असा दर होता. त्याकाळात एक शाकारणी कारागिरांच्या हाताखाली दोन कामगार काम करत असत. तर त्यांना मदत करण्यासाठी घरांतील लोक येत असत.
अशी करतात कौलारू घरांची शाकारणी
कौलारू घरांची शाकारणी करताना ज्या घराची शाकारणी करावयाची आहे. त्यासाठी लागणारे घाणेरीचा झाडू व ताटीपासून छप्पर तयार केले जाते. त्यासाठी लाल मातीच्या साह्याने तयार करण्यात आलेली कौले त्या छप्परावर एकसारख्या ओळीत बसवली जातात. बारीक सुपाच्या आकारात तयार केलेली कौले ही कारागिर कुशलतापूर्वक घराच्या छतावर बसवतात त्यातून पावसाळ्यात पाण्याची गळती होणार नाही याची काळजी घेतली जाते. हे काम कौशल्याचे असल्याने ते ग्रामीण भागातही मोजक्याच लोकांना येत आहे.


अनुभवाचे शाकारणी कौशल्य
ज्या पद्धतीने आजच्या काळात अनेक मोठमोठ्या इंजिनिअरिंग महाविद्यालयामधून इमारत बांधकामाचे अद्ययावतपणे कौशल्य दिले जाते. तर त्यासाठी महागड्या फीची आकारणी केली जाते. त्यातून विद्यार्थी बांधकामाची पदवी घेऊन इमारती बांधतात. याउलट जुन्या काळातील शाकारणी कारागिर आपल्या वर्षानुवर्षाच्या अनुभवाच्या आधारावर कुशलतापूर्वक कौलारू घरांचे बांधकाम व शाकारणी करतात.
मॉडर्न घरांना कौलांची सजावट
बदलत्या काळानुसार दगड, मातीपासून बांधण्यात आलेली घरे कालबाह्य झाली आहेत. तर आताच्या काळात बेंगलोर पद्धतीने बांधण्यात आलेल्या सिमेंट अन् वाळूच्या घरांच्या सजावटीसाठी लाल रंगाच्या कौलांचा वापर केला जात आहे. कौलांच्या वापरामुळे या घरांना वेगळी शोभा प्राप्त होत आहे.

Web Title: 'Kolaru' house collapse in cement forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.