किसान सन्मान योजना: कृषी विभागाची धडपड; साताऱ्यातील ९० हजार शेतकऱ्यांना केले पात्र

By नितीन काळेल | Published: January 9, 2024 06:07 PM2024-01-09T18:07:45+5:302024-01-09T18:07:58+5:30

वर्षाला मिळणार १२ हजार : ई-केवायसी अन् आधार प्रमाणीकरण पूर्ण 

Kisan Samman Yojana: Efforts by Agriculture Department; 90 thousand farmers in Satara are eligible | किसान सन्मान योजना: कृषी विभागाची धडपड; साताऱ्यातील ९० हजार शेतकऱ्यांना केले पात्र

किसान सन्मान योजना: कृषी विभागाची धडपड; साताऱ्यातील ९० हजार शेतकऱ्यांना केले पात्र

सातारा : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत मिळत आहे. तरीही जिल्ह्यातील हजारो शेतकरी ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणापासून दूर राहिल्याने त्यांना लाभ मिळत नव्हता. यासाठी राज्य कृषी विभागाने धडपड करुन सुमारे ९० हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली. त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली आहे.   

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत व्हावी म्हणून वर्षाला सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मागील पाच वर्षे ही योजना सुरू आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तीन हप्त्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होतात. यातून शेतकरी शेतीपयोगी साहित्य, बियाणे, खते यांची खरेदी करतो. याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. तसेच आता राज्य शासनानेही शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ दिला जातोय. राज्य शासनही शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देत आहे.

या योजनेचा सातारा जिल्ह्यातीलही शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे. या योजनेेंतर्गत ४ लाख ६६ हजार २०० शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. याच शेतकऱ्यांनाही नमो योजनेचा लाभ देय आहे. मात्र, योजनेत नोंद असूनही ७५ हजार ६७६ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नव्हती. तसेच ७२ हजार ३२६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नव्हते. यामुळे संबंधित शेतकरी लाभापासून वंचित होते. यासाठी राज्य कृषी विभागाने पूर्ण तयारी करुन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पाऊल उचलले. गावोगावी सभा, मेळावे घेत जनजागृती केली. त्यामुळे ४४ हजार १५१ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात यश आले. तर ४५ हजार ९३८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. यामुळे सुमारे ९० हजार शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. परिणामी वर्षाला त्यांच्या बॅंक खात्यावर १२ हजार रुपये जमा होणाार आहेत.

आठ दिवसांत योजनेचा लाभ..

सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत ८ हजार ५१० शेतकऱ्यांनी स्वयंनोंदणी केलेली आहे. त्यांना या योजनेच्या लाभाच्या प्रतिक्रियेत आणण्याचे काम ८ दिवसांत युध्दपातळीवर पूर्ण करण्यात आले. त्याचबरोबर तालुकास्तरावर मान्यतेसाठी प्रलंबित १४ हजार १७६ शेतकऱ्यांचीही प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. तर २० हजार ९१६ स्वयंनोंदणीकृत शेतकरी लाभऱ्श्यांची प्रक्रिया सुरू आहे. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान आणि राज्य शासनाच्या नमो योजनेचा लाभ मिळत आहे. या अंतर्गत कृषी विभागाने सुमारे ९० हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरण करुन घेतले. याचा लाभ आता शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी आदींनी अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी विकसित भारत यात्रेंतर्गत योजनेचे काम प्रगतीपथावर ठेवले आहे. पात्र शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा.  - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Kisan Samman Yojana: Efforts by Agriculture Department; 90 thousand farmers in Satara are eligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.