राजे जिंकले...राजे हरले!
By Admin | Updated: April 26, 2015 01:02 IST2015-04-26T01:00:11+5:302015-04-26T01:02:51+5:30
बंडखोरी झालीच : उदयनराजेंची वाट मोकळी करणारे रामराजे चक्रव्यूहात

राजे जिंकले...राजे हरले!
सागर गुजर /सातारा
जिल्हा बँकेत तब्बल सात उमेदवार बिनविरोध आणून रामराजे जिंकले खरे; परंतु त्यांच्या मतदार संघात त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले हे बिनविरोध निवडून आले असले तरी त्यांच्या एकाही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे ‘कही खुशी... कही गम’ अशी अवस्था या दोन राजेंची झाल्यामुळे ‘राजे जिंकले... राजे हरले’ असेच म्हणावे लागेल.
जिल्हा बँकेत पाय ठेवू देणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या रामराजेंनी उदयनराजेंविरोधातील आपला उमेदवार अखेर काढून टाकल्याने उदयनराजे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध ठरले. मात्र, फलटणच्या रामराजे विरोधकांनी त्यांचा उमेदवार कायम ठेवून आपला ‘पॉलिटिकल गेम’ खेळल्याने रामराजेंना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्याची मातृसंस्था असणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांत पेटलेले रण काही केल्या शमायला तयार नव्हते. यातूनच ‘उदयनराजेंना जिल्हा बँकेत पाय ठेवू देणार नाही,’ असा इशारा रामराजेंनी दिला. यावर ‘मला कोण रोखतो, ते पाहूच,’ असं म्हणून उदयनराजेही हट्टाला पेटले होते.
रामराजे फलटण सोसायटी मतदारसंघातून तर उदयनराजे गृहनिर्माण मतदारसंघातून निवडणूक लढणार होते. या पार्श्वभूमीवर फलटणमधला राजकीय संघर्षही पुढे आला. श्रीराम कारखान्याच्या रामराजेंच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंंबाळकर, कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी त्यांचे जवळचे कार्यकर्ते तुकाराम शिंदे यांना रामराजेंविरोधात उमेदवारी दिली. तर रामराजेंच्या गटाने महानंदचे संचालक डी. के. पवारांना उदयनराजेंविरोधात उभे केले. रामराजेंनी डी. के. यांना अर्ज मागे घ्यायला लावल्याने उदयनराजे बिनविरोध झाले; पण रामराजेंच्याविरोधातील तुकाराम शिंदेंचा अर्ज कायम राहिला असल्याने त्यांना निवडणूक अटळ आहे.
ज्याचा गाव...तोच राव !
एखाद्या गावात ज्याचे सर्वजण ऐकतात, तोच त्या गावचा राव असतो, असं म्हटलं जातं. अगदी याच बाबीचा अनुभव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपातही आला. नागरी बँका व पतसंस्था या मतदारसंघात वाठारकरांचे वर्चस्व आहे. तर औद्योगिक विणकर, मजूर संघात अनिल देसाई हमखास निवडून येणार याची खात्री आहे. याच निश्चितीवर राष्ट्रवादीने राजेश पाटील-वाठारकर व अनिल देसाई यांना उमेदवारी दिली.
उदयनराजे आले नाहीत तरी त्यांना घेतले
‘मला पॅनेलमध्ये घ्या,’ असं म्हणायला उदयनराजे स्वत:हून राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडे गेले नाहीत. लक्ष्मणतात्यांनीच त्यांची समजूत काढून ‘तुम्हाला पॅनेलमध्ये घेतले जाईल,’ असे सांगून उदयनराजेंना बिनविरोध करण्यात आले. बारामतीकरांचा फतवा अखेर नेतेमंडळींना मानावाच लागला.
लक्ष्मणतात्यांचा प्रभाव कायम
जिल्हा बँकेवर सुरेश वीर, उंडाळकर-पाटील आणि लक्ष्मणतात्या या तिघांचाच सुरुवातीपासून प्रभाव होता. मागील निवडणुकीत वीर पराभूत होऊन बँकेच्या राजकारणाबाहेर पडले तर उंडाळकरांची एकमुखी सत्ताही संपुष्टात येऊन लक्ष्मणतात्यांच्या हाती सगळे दोर गेले. तात्यांनी या निवडणुकीतही त्यांचे चिरंजीव नितीन पाटील यांना वाई सोसायटीतून बँकेसाठी वाट मोकळी केली तर स्वत: खरेदीविक्री मधून बिनविरोध निवडून आले.
शिवेंद्रसिंहराजेंचा आग्रह सार्थकी
राजकारणात नातेसंबंधांचे महत्त्व कायम राहिले आहे. दादाराजे खर्डेकर हे बँकेचे ज्येष्ठ संचालक तसेच आ. शिवेंद्रसिंहराजेंचे मामा आहेत. खर्डेकरांच्या उमेदवारीसाठी ते सुरुवातीपासूनच आग्रही होते. तो आग्रह त्यांनी कायम ठेवला. त्यामुळे पक्षाला खर्डेकरांना उमेदवारी द्यावीच लागली.
काका नक्की कोणाचे?
राष्ट्रवादीने २१ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार निश्चित केले आहेत. पण कऱ्हाड सोसायटी मतदारसंघात त्यांनी कोणालाच उमेदवारी दिली नाही. याठिकाणी माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर हे राष्ट्रवादीसोबत असतील याची चर्चा सुरुवातीपासून होती; पण अधिकृतरीत्या याबाबत कोणतीही घोषणा झाली नसल्याने काका नक्की कोणाचे? हा प्रश्न उरला आहे. निवडून येईल, तो आपला अशीच राष्ट्रवादीची खेळी.
नव्यांना संधीचे झाले काय?
उदयनराजेंनी नव्यांना जिल्हा बँकेत संधी देण्याची आग्रही भूमिका घेतली होती; पण याही निवडणुकीत विद्यमान संचालकांपैकी १५ जणांना पुन्हा संधी देण्यात आली. त्यामुळे नव्या चेहऱ्यांची मागणी फोल ठरल्याचे चित्र आहे.
बाळासाहेब नकोच आहेत..
बाळासाहेब पाटील यांचा मागील निवडणुकीत गृहनिर्माण मतदारसंघातून राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी असतानाही पराभव झाला होता. याचा राग त्यांच्या मनात असल्याने त्यांनी थेट कृषी प्रक्रियेतून अर्ज भरून शिवेंद्रसिंहराजेंविरोधातील राग व्यक्त केला. पक्षाच्या अधिकृत आमदाराला उमेदवारी नाकारण्याचे धाडस राष्ट्रवादीने दाखविले. याचा अर्थ बाळासाहेब त्यांना नकोच होते, असाच काही जण काढत आहेत.