कराड 'दक्षिण' -'उत्तर' काँग्रेसची तोंडे 'पूर्व'- 'पश्चिमे'ला ! घडतंय- बिघडतंय : 'सह्याद्री'च्या निवडणुकीत एकवाक्यता दिसेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 23:29 IST2025-03-29T23:27:58+5:302025-03-29T23:29:48+5:30
कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक पँनेल रिंगणात असताना काँग्रेसची इतर काही मंडळी मात्र इतरांना पाठिंबा देताना दिसत आहेत.

कराड 'दक्षिण' -'उत्तर' काँग्रेसची तोंडे 'पूर्व'- 'पश्चिमे'ला ! घडतंय- बिघडतंय : 'सह्याद्री'च्या निवडणुकीत एकवाक्यता दिसेना
प्रमोद सुकरे
यशवंतनगर (ता. कराड ) : येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होत आहे. त्यासाठी प्रचाराची रणधुमिळी सुरू आहे. मात्र या निवडणुकीत कराड दक्षिण उत्तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तोंडे पूर्व- पश्चिमेला दिसत आहेत. कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक पँनेल रिंगणात असताना काँग्रेसची इतर काही मंडळी मात्र इतरांना पाठिंबा देताना दिसत आहेत.
अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा तिरंगी होत आहे. त्यात सत्ताधारी कारखान्याचे अध्यक्ष व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील यांचे एक पॅनेल रिंगणात आहे. त्या विरोधात भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी स्वतंत्रपणे पँनेल उभे केले आहे. त्याला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील यांच्या गटाचा पाठिंबा आहे. तर काँग्रेसचे कराड उत्तर अध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली अजून एक तिसरे पँनेल रिंगणात असून त्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांचा पाठिंबा आहे.त्यामुळे सगळी भेळमिसळ झाली आहे.
कराड तालुका हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण त्याच तालुक्यातील परिस्थिती आता बदलली आहे. कराड दक्षिण व उत्तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात नुकतेच भाजपचे कमळ फुलले आहे. अशावेळी बॅक फुटल्या गेलेल्या काँग्रेसने एकजुटीने राहणे आवश्यक असताना सार्वजनिक निवडणूक वेगळी अन सहकारातील निवडणूक वेगळी अशी पळवाट काढत काँग्रेसच्या नेत्यांनी सह्याद्रीच्या निवडणुकीत घेतलेल्या सोयीच्या भूमिका सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र पटलेल्या दिसत नाहीत.
भरीस भर म्हणून ...
मुळातच काँग्रेसचे दोन गट वेगळे झाले असताना आता भरीस भर म्हणून कराड दक्षिण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी एक मेळावा घेत विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी पाटील पँनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यात माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंत जगताप,माजी पंचायत समिती सदस्य,उद्योजक नामदेव पाटील अन् कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांचे बंधू संदिप शिंदे आदिंचा समावेश आहे.त्यामुळे दक्षिण मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांना थेट विरोधच केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांना निश्चितच चिंतन करायला लावणारी आहे.
उत्तर मधीलही अनेकजण विरोधात
कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांनी 'सह्याद्री'च्या निवडणुकीत पँनेल उभे ठाकले आहे. पण त्यांच्या कार्यक्षेत्रातील म्हणजेच कराड उत्तर मतदार संघातील सुध्दा सगळी काँग्रेस त्यांच्या सोबत दिसत नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटिचे प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील चिखलीकर तर त्यांच्याविरोधातील पॅनेलच्या व्यासपीठावर जाहीर सभा ठोकत आहेत.तर इतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी यांनी देखील पी डी पाटील पँनेलला पाठिंबा दिल्याचे दिसत आहे.