कऱ्हाडमधील आणखी काही नगरसेवकांना ‘कमळा’ची भुरळ !
By Admin | Updated: September 15, 2014 23:20 IST2014-09-15T22:07:54+5:302014-09-15T23:20:16+5:30
आजच्या मेळाव्याकडे लक्ष : मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी भाजपचे प्रयत्न

कऱ्हाडमधील आणखी काही नगरसेवकांना ‘कमळा’ची भुरळ !
प्रमोद सुकरे - कऱ्हाड -हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विक्रम पावसकर महिन्यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले असताना आणखी काही नगरसेवकांना ‘कमळा’ची भुरळ पडल्याची चर्चा आहे़ पालिकेत सत्तेत ‘गडकरी’ असणारा नगरसेवकांचा एक गटच भाजप नेत्यांच्या संपर्कात आहे म्हणे..! आजवर ज्यांचे नेतृत्व मानले ्त्यांच्या हातात हात देणार की, हातात कमळ धरणार याचा निर्णय मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात होईल.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून राजेंद्र यादव, विजय यादव यांची ओळख़ पृथ्वीराज चव्हाण पंतप्र्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री झाल्यावर असो अथवा मुख्यमंत्री झाल्यावर असो, त्यांच्या कऱ्हाडातील जंगी स्वागतात हे दोघे नेहमीच अग्रभागी राहिले; पण अडीच वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीवेळी कुठेतरी माशी शिंकली अन् राजेंद्र यादवांचा आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशी समझोता झाला. त्यातून यशवंत विकास आघाडी निवडणुकीत उतरली़ त्यांचे सहा नगरसेवक आहेत़ यादव स्वत: उपनगराध्यक्ष आहेत़ तेव्हापासून शहराच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे़
सहा महिन्यांपूर्वी कऱ्हाड दक्षिणच्या संभाव्य उमेदवारांत त्यांचेही नाव होते़ मात्र मध्यंतरी थोडासा ब्रेक लागला; पण गेल्या आठ दिवसात त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत़ मंगळवारी (दि़ १६) त्यांनी या संदर्भात कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतलाय़ त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे़ दरम्यान, रविवारी पंकजा मुंडे सातारा दौऱ्यात असताना यादव बंधूंनी त्यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
राष्ट्रवादी मेळाव्याकडे पाठ
कऱ्हाड पालिकेत लोकशाही व यशवंत विकास आघाडीची सत्ता आहे़ लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील दक्षिणेतून राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी मेळावा घेतला होता. त्याच्या निमंत्रणपत्रिकेवर उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचे नाव होते़ मात्र, यादवांसह त्यांच्या नगरसेवकांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली़
विधानसभा निवडणुकीत काय करायचे याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही़ मंगळवारी आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे़ यावेळी कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील निर्णय घेणार आहे़
- राजेंद्र यादव,
उपनगराध्यक्ष, कऱ्हाड