लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्याने तयार केल्या बांबूपासून वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:50+5:302021-06-16T04:50:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुडाळ : ‘शाळा बंद, पण शिक्षण मात्र सुरू’ या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्याला निश्चितच वाव मिळाला ...

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्याने तयार केल्या बांबूपासून वस्तू
लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : ‘शाळा बंद, पण शिक्षण मात्र सुरू’ या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्याला निश्चितच वाव मिळाला आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे विविध मार्गाने शिक्षण सुरू ठेवत, त्यांच्यातील सुप्त गुणांना या काळात एक चांगली संधी मिळाली. जिल्हा परिषदेच्या कुडाळ केंद्र शाळेत सातवीत शिक्षण घेणाऱ्या ओम परामणे याने लॉकडाऊनचा सदुपयोग करीत आपल्या कौशल्याने बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करून आदर्श ठेवला आहे.
लॉकडाऊनचा हा काळ तसा सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. विद्यार्थीही प्रत्यक्ष शिक्षणापासून दुरावत ऑनलाइनद्वारेच शिक्षण घेत आहेत. अशातच दिवसभर घरात बसून त्यांनाही याचा कंटाळा वाटू लागला आहे. मात्र, अशा परिस्थितीला संधी मानून ओम केतन परामणे या सातवीच्या विद्यार्थ्याने आपल्यातील कलेचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. मुळातच विविध वस्तू बनवण्याची आवड असणाऱ्या ओमला बांबूपासून विविध वस्तू बनविण्याची कल्पना सुचली. त्याच्या या कल्पकतेला आई, वडील, आजोबा, शाळेतील शिक्षक यांची नेहमीच मदत आणि मार्गदर्शन मिळाले.
ओमच्या वडिलांनी शेतातील बांबू तोडून ठेवले होते. आपण यापासून काहीतरी वेगळी आकर्षक, उपयोगी होईल, अशी निर्मिती करू यात, असे त्याने ठरवले. सुरुवातीला छोटा टेबल तयार केला. यानंतर, यापासून खुर्ची, छोटा टी पॉय आणि याच्या कौशल्याचा अप्रतिम नमुना म्हणजे याने तयार केलेली चप्पल होय. या कोरोना काळात आपल्या कलेमध्ये स्वत:ला गुंतवून अप्रतिम अशी कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न या बालकाने केला आहे.
(कोट)
मला लहानपणापासूनच अशा वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याची आवड आहे. अभ्याबरोबरच मी हा छंद जोपासत आहे. यापूवीर्ही मातीच्या मूर्ती, करवंटीपासून आकर्षक वस्तू बनविल्या आहेत. कोरोना काळात बांबूपासून विविध वस्तू तयार केल्या. कुटुंबीय व शिक्षक सर्वांचेच सहकार्य मला मिळाले.
- ओम केतन परामणे, विद्यार्थी
(कोट)
पहिलीपासून ओम हा आमच्या कुडाळ प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. त्याचा बौद्धिकच नव्हे, तर सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीनेच त्याला वेळोवेळी आमच्याकडून मार्गदर्शन होत गेले. लॉकडाऊन काळातील त्याने केलेली ही निर्मिती खरोखरच सर्वांनाच प्रेणादायी आहे.
- दीपाली कुंभार, शिक्षिका, कुडाळ
फोटो : १५ ओम परामणे
कुडाळ येथील ओम परामणे या सातवीतील विद्यार्थ्याने बांबूपासून विविध वस्तू तयार केल्या आहेत.
लोगो : पॉझिटिव्ह स्टोेरी