या जन्मात घर बांधणे झाले कठीण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:22+5:302021-09-02T05:23:22+5:30
सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शेतजमिनीचे तुकडे करून खरेदी-विक्री करण्यावर बंदी आल्याने अल्प उत्पन्नात घराचे स्वप्न पाहणाऱ्या ...

या जन्मात घर बांधणे झाले कठीण!
सागर गुजर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शेतजमिनीचे तुकडे करून खरेदी-विक्री करण्यावर बंदी आल्याने अल्प उत्पन्नात घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांना या जन्मात तरी जागा घेऊन घर बांधता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अकृषिक जमिनीचे (एनए प्लॉट) तुकडे पाडून खरेदी-विक्री करण्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक राहणार आहे. यासंदर्भातील अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे, यामुळे सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नावर विरजण पडणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, महसुलात प्रचंड प्रमाणात घट झालेली आहे. तसेच पैसे साठवत जागा खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कष्टकरी समाजाला तर झोपडपट्टीत अथवा भाड्याच्या घरात राहावे लागणार आहे. शासनाने या निर्णयाचा फेरविचार केला नाही, तर मोठी सामाजिक समस्या निर्माण होणार आहे.
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
१) काय आहे नवा निर्णय (बॉक्स)
यापूर्वी शेतजमिनींचे व्यवहार गुंठ्यामध्ये होत होते. आता मात्र १२ जुलैच्या शासन निर्णयानुसार शेतजमिनींचे व्यवहार करायचे झाल्यास किमान भात शेती २० गुंठे, बागायत एक एकर आणि जिरायत दोन एकर असेल तरच व्यवहार होऊ शकतो.
२) काय होणार परिणाम
एन ए प्लॉटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणे अवघड आहे. किमान गुंठाभर शेतजमीन खरेदी करून गरीब लोक घर बांधू शकत होते. आता मात्र त्यांच्या घराचे स्वप्न अधुरे राहणार आहे.
३) पूर्वीप्रमाणेच परवानगी हवी
कोट..
एनए प्लॉट असल्याशिवाय मोठी इमारत बांधता येत नाही. तसेच कर्जही मिळत नाही. त्यामुळे मोठ्या बांधकामांवर त्याचा परिणाम होणार नसला, तरी शेतजमिनीचा तुकडा खरेदी करून त्यावर छोटेसे घर बांधू इच्छिणाऱ्यांना ते शक्य राहिलेले नाही.
- प्रशांत सावंत, इनोव्हेटिव्ह कन्स्ट्रक्शन
कोट...
जागेवर जर ग्रीन झोन असेल तरी लोक जमिनींचे व्यवहार करत होते. ग्रीन झोन जमिनीमध्ये घर बांधता येत नाही. आता एका गुंठ्यामध्ये शेतजमीन खरेदी-विक्री व्यवहार थांबले असल्याने बेकायदा खरेदी-विक्रीला आळा बसू शकतो.
- संदीप चव्हाण, कंत्राटदार
४) मोठ्या जागेसाठी पैसा आणणार कोठून?
कोट..
कष्टकरी व गरीब लोकांची अवस्था बाप भीक मागू देईना अन् आई जगू देईना...अशी झालेली आहे. धनदांडग्यांना केंद्रस्थानी ठेवून शासन निर्णय घेत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून तरी ही अपेक्षा नाही.
- संतोष पवार
कोट...
शेतजमिनीचा तुकडा खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत होतो, त्यासाठी पैशांची जमवाजमव सुरू होती. मात्र आता कृषी जमीन खरेदी करायची झाल्यास किमान २० गुंठ्यांची अट घातलेली आहे. शहराजवळच्या जमिनींचा दर पाहता, या जन्मात तरी एवढी जमीन आम्हाला खरेदी करता येणार नाही.
- संदीप इथापे