दात किडण्यास चॉकलेट नव्हे... थुंकीतील अमलीय घटक कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:26+5:302021-08-28T04:43:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दातांच्या आरोग्यात थुंकीतील अमलीय घटक सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावतात. दात किडण्यात चॉकलेट हे योगदान ...

दात किडण्यास चॉकलेट नव्हे... थुंकीतील अमलीय घटक कारणीभूत
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दातांच्या आरोग्यात थुंकीतील अमलीय घटक सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावतात. दात किडण्यात चॉकलेट हे योगदान देणारे घटक आहे. चॉकलेटसह गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चुळ भरा आणि सकाळी-रात्री ब्रश करण्याने दातांचे आरोग्य टिकून राहते, असे तज्ज्ञ सांगतात.
दातांचे दुखणे सर्वाधिक वेदनादायी असते. या दुखण्याने अक्षरश: खाण्याचेही वांदे होतात. अति काळजी आणि टोकाचे दुर्लक्ष या दोन्ही बाबी दातांच्या आरोग्यासाठी घातक आहेत. कोणतेही अन्न दातांनी चावून खाऊन ते थुंकीत मिसळून मगच पोटात जाते. त्यामुळे सुदृढ आरोग्याची पहिली पायरी असलेल्या दातांचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षांत चॉकलेट आणि कॅडबरीने दात किडतात, हा समज अनेकांच्या मनात रूढ आहे. मात्र, वैद्यकीय व्यवसायातील लोकांनी हे मान्य नाही. त्यांच्या मते थुंकीतील अंमली पदार्थच दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात.
चिकट आणि गोड पदार्थ टाळा!
दात किडणे म्हटले की त्याचे खापर सर्रासपणे चॉकलेट खाण्यावर फोडणे चुकीचे आहे. चिकट आणि गोड पदार्थांचे सेवन केले, तर त्याचे कण दातांवर आणि दातांमध्ये चिकटून राहतात. अशा पदार्थांचे सेवन केल्यानंतर तातडीने चुळ भरणे आवश्यक असते. दातांवर जर या पदार्थांचा थर साचून राहिला, तर त्यावर जिवाणू तयार होतात. त्यातून पुढे कीड तयार होऊन दातांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे दातांचे आरोग्य राखण्यासाठी गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चुळ भरणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
अशी घ्या दातांची काळजी
सकाळी आणि रात्री अशा दोन्हीवेळेला दात स्वच्छ करण्याची सवय अंगिकारणे आवश्यक आहे. सकस आहारही महत्त्वाचा भाग आहे. चिकट पदार्थ खाणे शक्यतो टाळा. वारंवार खाण्यासाठी तोंड चालविणाऱ्यावर मर्यादा आणा आणि सर्वात महत्त्वाचे दात दुखो अथवा न दुखो, सहा महिन्यांनी दंतचिकित्सकांकडे तपासणी करून घ्या.
लहानपणीच दातांना कीड
चॉकलेट खाण्याने दात किडतात, असे म्हणतात; पण अनेक बालकांचे दुधाचेच दात किडलेल्या अवस्थेतच येतात. शास्त्रीय भाषेत याला नर्सिंग केरी असे म्हणतात. नवजात अर्भक स्तनपान झाल्यानंतर झोपी जाते. त्याच्या हिरड्या स्वच्छ न केल्याने त्याच्यावर दुधाचा थर साचत जातो. परिणामी या बाळाला दात येताना ते किडलेले येण्याची शक्यता बळावते. त्यामुळे स्तनपानानंतर मऊ फडक्याने हिरड्या स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे.
दात किडण्यात लाळेची भूमिका महत्त्वाची!
दाताची स्वच्छता राखण्याची सवय असलेल्यांचेही दात किडतात. दात किडण्यात तोंडातील थुंकीची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची असते. थुंकीत अमलीय घटकांचा समावेश असेल, तर दात किडण्याची प्रक्रिया तुलनेने कमी होते. याउलट ज्यांच्या लाळेत पीएच घटक असतो, त्यांनी कितीही काळजी घेतली, तरी दाताचे दुखणे उद्भवते. वर्षानुवर्षे दात घासण्याची माहिती नसणाऱ्या अनेक फिरस्त्यांचे दात निरोगी असण्याचे ते एक कारण मानले जाते.
दुधाच्या दातांकडे दुर्लक्ष नको
दुधाच्या दातांची विशेष काळजी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. तसेही हे दात पडणारच आहेत, नवीन येतील चांगले, असा पालकांचा समज असतो. पण लहानपणी तुम्ही ज्या दातांनी खाता ते दातच तुमचं व्यक्तिमत्त्व घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, याचा सोयीस्कर विसर पालकांना पडतो. वास्तविक पाहता प्रत्येक टप्प्यात दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. दातांची नैसर्गिक रचना न मोडता दुधाच्या दातांचीही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
कोट :
चॉकलेट, कॅडबरीसह गोड पदार्थ खाणे वाईट नाही. पण ते खाल्ल्यानंतर आवश्यक स्वच्छता करणे गरजेचे आहे. दातांमध्ये अन्नपदार्थ अडकले की त्यावर जिवाणू तयार होतात. या जिवाणूंच्या वाढीमुळे दातावरील अनॅमलचा थर निघून जातो आणि दुखणे सुरू होते. या पहिल्याच टप्प्यात वैद्यकीय सल्ला घेतला, तर दुखणे बळावत नाही. दातांच्या नसेपासून हाडापर्यंत कीड पोहोचली तर ती अत्यंत वेदनादायी अनुभूती देते, हे नक्की.
डॉ. अदिती घोरपडे, दंतचिकित्सक, सातारा