Maratha Reservation: आक्रमक आंदोलनाऐवजी सकारात्मक विचार करावा, मंत्री शंभूराज देसाईंचा जरांगेंना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:19 IST2025-08-26T17:19:13+5:302025-08-26T17:19:49+5:30
अभ्यासू नेत्यांचे सरकार..

Maratha Reservation: आक्रमक आंदोलनाऐवजी सकारात्मक विचार करावा, मंत्री शंभूराज देसाईंचा जरांगेंना सल्ला
सातारा : ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार संवेदनशील असून केव्हाही मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. त्यामुळे आक्रमक आंदोलन करण्याऐवजी सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे,’ असा सल्ला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे यांना दिला.
सातारा येथे पालकमंत्री कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देसाई म्हणाले, ‘मी यापूर्वीच्या सरकारमध्येमराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य होतो. त्यामुळे वेळोवेळी जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा केली असून, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक प्रश्न मार्गी लावले. कुणबी नोंदी शोधणे, जस्टीस शिंदे समितीला मुदतवाढ देणे या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण झाल्या. तरी काही मागण्या प्रलंबित राहिल्या आहेत. यामुळे जरांगे-पाटील हे आंदोलन करत आहेत. त्याची दखल सरकार घेईल आणि त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करेल.
शिंदे सरकारच्या काळात जरांगे यांचे आंदाेलन चांगल्या प्रकारे हाताळले गेले; पण फडणवीस सरकारला हाताळता येत नसल्याची चर्चा लोकांमध्ये असल्याबाबत छेडले असता देसाई यांनी ‘यावर मी काय बोलू’ असा प्रतिप्रश्न केला. तसेच मी महायुती सरकार म्हणून सांगेन की राज्य सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करण्यापासून कुठेही मागे हटणार नाही, शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. उपसमिती जरांगे-पाटील यांच्याशी मुद्देसूद चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
अभ्यासू नेत्यांचे सरकार..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण मिळाले. कुणबी नोंदी उपलब्ध झाल्या. या नोंदींवर आधारित नोकऱ्या मिळाल्या. महायुती सरकार हे अभ्यासू नेत्यांचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या प्रश्नात नक्कीच लक्ष घालतील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.