कऱ्हाड : वहागाव, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीने वेगळा पायंडा पाडत इतर ग्रामपंचायतींसमोर आदर्श निर्माण केला. गावातील प्रत्येक घरातील मोबाईल आणि टीव्ही सायंकाळी दोन तास बंद ठेऊन मुलांना अभ्यासाला बसविण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेने केला. तसेच त्यासाठी दररोज ग्रामपंचायतीकडून भोंगाही वाजविला जाणाराय, हे विशेष.वहागाव येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच घरोघरी होणारा मोबाईल व टीव्हीचा अतिरेकी वापर, यावरही अनेकांनी मते मांडली. मोबाईल, इंटरनेट, टीव्ही यामुळे भविष्यात वाढणारे दुष्परीणाम, वाढत्या मोबाईलचे फायदे व तोटे यावर ग्रामसभेत ऊहापोह झाला. अखेर मुलांचा अभ्यास होण्यासाठी तसेच मुले टीव्ही व मोबाईलपासून दूर राहण्यासाठी सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ या वेळेत प्रत्येक घरातील मोबाईल व टीव्ही बंद करण्याचे ठरले.तसेच या दोन तासाच्या कालावधीत पालकांनी आपल्या मुलांना अभ्यास करावयास लावण्याचाही निर्णय झाला. या निर्णयाचे ठरावात रुपांतर करुन हा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. मोबाईल, टीव्ही बंद करण्याची पुर्वसुचना देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दररोज सायंकाळी साडेसहा वाजता ‘भोंगा’ वाजविला जाणार आहे. भोंगा वाजताच ग्रामस्थांनी आपल्या घरातील टीव्ही, मोबाईल बंद करावेत, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले.यावेळी महिला, ग्रामस्थ, पालक, युवकांनी चर्चेत सहभाग घेऊन आपले मत मांडले. तसेच येणाऱ्या काळात आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून अभ्यास, क्रीडा, कला यावर विशेष भर देण्यासाठी प्रयत्न करावयचे ठरवण्यात आले.
सातारा: मुलांच्या अभ्यासासाठी वहागाव ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम, केला महत्वाचा ठराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 14:53 IST