Local Body Election Results 2025: सातारा जिल्ह्यात भाजपचा वारू कराड, पाचगणी, महाबळेश्वरला रोखला
By दीपक देशमुख | Updated: December 22, 2025 18:08 IST2025-12-22T18:07:40+5:302025-12-22T18:08:20+5:30
सहा नगरपालिकांमध्ये महाविकास आघाडीची पिछेहाट

Local Body Election Results 2025: सातारा जिल्ह्यात भाजपचा वारू कराड, पाचगणी, महाबळेश्वरला रोखला
दीपक देशमुख
सातारा : विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीतील दारुण पराभवातून महाविकास आघाडी अद्याप सावरलेली नसल्याचे नगरपालिकांच्या निकालांनी स्पष्ट केले आहे. नगरपालिकांच्या लढती महायुतीच्या मित्रपक्षातच झाल्या. तथापि, कराड, पाचगणी, महाबळेश्वर पालिका अपवाद ठरल्या. या तिन्ही पालिकांमध्ये भाजपचा वारू विरेाधी आघाड्यांनी रोखला. उर्वरित पालिकांमध्ये महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली.
सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सुरुवातीपासूनच भाजपने कमळ फुलविण्याचा इरादा ठेवला होता. दुसरीकडे भाजपविरोधात महाविकास आघाडीने चांगल्याप्रकारे मोट बांधली नाही. तसेच महायुतीच्या इतर मित्रपक्षांशीही सुसंवाद साधला गेला नाही.
वाचा : साताऱ्यात भाजप ‘सिकंदर’ तर अपक्ष उमेदवार ‘धुरंधर’!, पालिकेत शिंदेसेनेचीही झाली एंट्री
नवखे उमेदवार, मतदारांपर्यंत आपला अजेंडा पोहोचविण्यात आलेले अपयश आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांसह मोठ्या नेत्यांची ताकद न मिळाल्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली. कराडमध्येभाजपाविरोधात पक्षविरहित लोकशाही-यशवंत आघाडीने भाजपाला रोखले.
कोणत्या पालिकेत काय
१) सातारा पालिकेमध्ये शिंदेसेनेने महाविकास आघाडीशी सुसंवाद साधला नाही. शिंदेसेनेच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली तरी विजयाची मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांना महाविकास आघाडीची कुमक उपयोगी ठरू शकली असती.
२) फलटणमध्ये रणनीतीचा अभाव, आयत्या वेळी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय रामराजे गटासाठी घातक ठरला. फलटणची लढतही महायुतीच्या दोन पक्षांतच झाली.
३) म्हसवड पालिका निवडणुकीत शेखर गोरे यांनी रिंगणात उतरवलेले सर्व उमेदवार माघारी घेत मंत्री गोरे यांना पाठिंबा दिला. दोन भावांच्या एकजुटीपुढे महाविकास आघाडी पूर्णपणे निष्प्रभ झाली.
४) मलकापुरात काँग्रेससह इतर पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. उंडाळकर गटानेही राष्ट्रवादी (अजित पवार), उद्धवसेना, काँग्रेस व अपक्षांनी आघाडी केली. त्यांना सत्ता मिळवता आली नाही.
५) पाचगणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांचे पॅनल उतरवलेल्या लक्ष्मी कऱ्हाडकर यांना धक्का देत सत्तांतर केले.
६) वाई नगरपालिकेत भाजपाने मुसंडी मारली. याठिकाणीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपत लढत झाली. महाविकास आघाडीचे अस्तित्वच दिसून आले नाही.
७) रहिमतपुरातही भाजपने मुसंडी मारत राष्ट्रवादीकडून सत्ता हिरावून घेतली. नगरपालिकेची सत्ता राखण्यासाठी सुनील माने यांनी तुतारी खाली ठेवून घड्याळाला निशाण केले. परंतु, ज्येष्ठ नेत्या चित्रलेखा माने-कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोरदार मोट बांधली. त्यामुळे सुनील माने यांची ना तुतारी वाजली, ना गजर झाला. याठिकाणी प्रथमच कमळ फुलले.
८) कराड येथे लोकशाही आघाडीचे बाळासाहेब पाटील आणि यशवंत आघाडीचे राजेंद्रसिंह यादव यांनी एकत्र येत भाजपचा वारू रोखला. काँग्रेसचे पक्ष चिन्हावर लढण्याचे धोरण ठरवत नगराध्यक्ष पदासाठी जाकीर पठाण यांना उमेदवार दिली. तरीही अल्पसंख्याकांची मतांची विभागणी न होता राजेंद्रसिंह यादव निवडून गेले.
९) महाबळेश्वरमध्ये शिंदेसेना व भाजपने जोरदार फिल्डिंग लावली होती, तर राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी चार दिवस शहरात मुक्काम करून प्रचार यंत्रणा राबविली. मात्र, महाविकास आघाडीचे अस्तित्व दिसून आले नाही.
१०) मेढा नगरपंचायतीमध्येही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एकच नगरसेवक निवडून गेला.