Satara: अनोखी परंपरा! महिलांनी सुखेड अन् बोरीच्या ओढ्यावर वाहिली शिव्यांची लाखोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:55 IST2025-07-31T13:54:44+5:302025-07-31T13:55:07+5:30

सनई, हलगीच्या तालावर वाजत-गाजत शिव्यांच्या भडिमारात रंगला बोरीचा बार

In Sukhed and Bori in Khandala taluka of Satara, women gathered at a stream and continued a unique tradition by hurling abuse at each other | Satara: अनोखी परंपरा! महिलांनी सुखेड अन् बोरीच्या ओढ्यावर वाहिली शिव्यांची लाखोली

Satara: अनोखी परंपरा! महिलांनी सुखेड अन् बोरीच्या ओढ्यावर वाहिली शिव्यांची लाखोली

लोणंद : संपूर्ण महाराष्ट्रात शिव्या देण्याची अनोखी परंपरा असलेला बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने बुधवारी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी दरम्यान वाहणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही तीरावर मोठ्या उत्साहात पार पडला. दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत-गाजत ओढ्यावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत ही अनोखी परंपरा कायम ठेवली.

नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पार पडणारा सुखेड व बोरी गावातील बोरीचा बार संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या दिवशी दोन्ही गावांतील महिला एकत्र येऊन एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात. गावातील ओढ्यावर जमून दोन्ही बाजूकडील महिलांकडून एकमेकांना हातवारे करीत शिव्या दिल्या जातात.

‘बोरीचा बार’ सुरू होताना दोन्ही गावांतील महिला एकत्र येऊन ओढ्यावर शिव्यांची लाखोली वाहत असतात. त्यावेळी पुरुष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही महिलांना एकमेकींपासून लांब ओढण्याचा प्रयत्न करतात. श्रावणातल्या षष्ठीला हा बोरीचा बार साजरा होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढत होता. बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावांतील महिला ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र आल्या. तेथून या महिला झिम्मा, फुगडी, फेर धरत ओढ्यापर्यंत गेल्या.

यंदा ओढ्याला पाणी कमी..

यंदा ओढ्याला पाणी कमी असल्याने त्यांनी सुरुवातीला ओढ्याच्या काठावर उभे राहून पैलतीरावर असलेल्या महिलांवर शिव्यांचा भडीमार करीत बोरीच्या बाराची सुरुवात केली तर नंतर दोन्ही बाजूकडील महिलांनी हातवारे करत यंदाचा बार उत्साहात साजरा केला. यावेळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी शांतता व सुव्यवस्थेसाठी महिला पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता.

अनेक वर्षांची परंपरा..

या ‘बोरीच्या बार’संदर्भात एक दंतकथा आहे. एक पाटील होते. त्यांना दोन बायका होत्या. पैकी एक सुखेड, तर दुसरी बोरी या गावातील होत्या. त्या दररोज दोन्ही गावांची शिव असणाऱ्या ओढ्यावर धुणे धुण्यासाठी येत होत्या. ओढ्यावर दोघी एकत्र आल्यावर त्यांच्यात वाद होऊन दोघी एकमेकींना हातवारे करत शिव्या द्यायच्या. यावरून ‘बोरीचा बार’ अशी प्रथा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. दोन्ही गावांतील सासरी गेलेल्या महिलासुद्धा माहेरी येतात. केवळ जिल्ह्यातून नव्हे, तर इतर जिल्ह्यांतूनही हा ‘बोरीचा बार’ पाहण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होते. दरम्यान, या पारंपरिक सोहळ्यात सुमारे दीड ते दोन हजार महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title: In Sukhed and Bori in Khandala taluka of Satara, women gathered at a stream and continued a unique tradition by hurling abuse at each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.