Prithviraj Chavan: भाजपामध्ये निम्मे आमदार काँग्रेसचेच, पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला टोला
By प्रमोद सुकरे | Updated: February 7, 2023 17:14 IST2023-02-07T17:12:01+5:302023-02-07T17:14:03+5:30
भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडत असतात

Prithviraj Chavan: भाजपामध्ये निम्मे आमदार काँग्रेसचेच, पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला टोला
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : बाळासाहेब थोरात यांच्या राजीनामा देण्यामागे भाजपाचा हात आहे का? ते भाजपाच्या वाटेवर असतील असं वाटतं का? या प्रश्नांवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपचा प्रत्येक गोष्टीमध्ये हात असतो. भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडत असतात. भाजपमध्ये आमदारांच्या संख्याबळ बघितलं तर निम्मी माणसे ही काँग्रेसचीच आहेत.
पृथ्वीराज चव्हाण हे कराड येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला, याविषयी मला माहिती नाही. मात्र, नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेसची हक्काची जागा होती. ती आता असणार नाही. त्यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी होणार आहे.
सदरची गोष्ट गंभीर आहे आणि त्याची चौकशी वरिष्ठांकडून होत आहे. तसेच पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या समवेत १५ तारखेच्या बैठकीत सविस्तर चर्चा होईल. बाळासाहेब थोरात यांनी अन्याय झाला आहे, असे म्हटले असेल तर हाय कमांड या प्रकरणाची चौकशी करेल.
काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेणार?
काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन गटबाजी समोर आली होती. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आता विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. आता या प्रकरणी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे सांगण्यात येत आहे.