सातारा : नाष्ट्यासाठी कढई का दिली नाही, अशी विचारणा केल्याच्या रागातून पत्नीने पतीवर भाजी कापण्याच्या सुरीने हल्ला चढविला. यात पती जखमी झाला असून याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. ११) शाहूपुरीत घडली.भाग्यश्री पुरुषोत्तम साळवी (वय ३७, रा. समता पार्क, शाहूपुरी सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम पांडुरंग साळवी (वय ४०, रा. समता पार्क, शाहूपुरी सातारा) यांनी पत्नी भाग्यश्री साळवी यांना नाष्ट्यासाठी कढई धुवून का दिली नाही, अशी विचारणा केली. या रागातून पत्नीने घरातील भाजी कापण्याची सुरी घेऊन अचानक त्यांच्यावर हल्ला केला. पुरुषोत्तम साळवी यांच्या उजव्या पायाच्या नडगीवर ठिकठिकाणी सुरीचे वार करण्यात आले. या झटापटीत पत्नीच्या हातून सुरी घेत असताना साळवी यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर तसेच मनगटाजवळ त्याचप्रमाणे उजव्या हाताच्या मनगटाजवळ पत्नीने चावा घेऊन त्यांना जखमी केले. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पुरुषोत्तम साळवी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित भाग्यश्री साळवी यांच्यावर गुन्हा दाखल केला. हवालदार वाघ हे अधिक तपास करीत आहेत.
..अन् रागात पत्नीने पतीवर केला सुरीने वार, साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:06 IST