सरसकट 'आले' खरेदीचा निर्णय सर्वत्र राबवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी 

By दीपक शिंदे | Published: June 24, 2024 07:38 PM2024-06-24T19:38:17+5:302024-06-24T19:38:50+5:30

..अन्यथा रोषाला सामोरे जाण्याचा इशारा

Implement the decision to buy Ginger everywhere, demands of Swabhimani Shetkari Saghtana | सरसकट 'आले' खरेदीचा निर्णय सर्वत्र राबवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी 

सरसकट 'आले' खरेदीचा निर्णय सर्वत्र राबवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी 

सातारा : व्यापारी प्रतवारीनुसार आले खरेदी करताना जुने आले फक्त खरेदी करत होते, तर नवीन आले तसेच रानामध्ये टाकून देत होते. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेला आठवडाभर रान उठवले होते. प्रतवारीनुसार सौदे करणाऱ्या व्यापाऱ्यांची लायसन्स रद्दबातल करा, अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलन आले उत्पादकांचा रेटा आणि लोकमतची लेखमाला यांच्या रेट्यामुळे सातारा बाजार समितीने बैठक घेत प्रतवारीनुसार आले खरेदी करता येणार नसल्याचे जाहीर केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय जिल्हाभर तसेच सांगली जिल्ह्यातही लागू करावा, अशी मागणी केली आहे.

आले उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी याबाबतचे निवेदन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दिले. त्यानुसार आले व्यापाऱ्यांनी उत्पादकांना सौदा पट्टी दिली पाहिजे. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनीही अधिकृत लायसन्सधारक व्यापाऱ्यांना माल द्यावा, यासाठी बाजार समितीने प्रबोधन करावे, अशा मागण्या यावेळेला करण्यात आल्या.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिल पवार, युवा प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके, खटाव तालुकाध्यक्ष दत्तू काका घार्गे, तालुका संघटक संतोष पंडित, अनिल गायकवाड, प्रशांत जाधव, राहुल निकम, आनंदराव कदम, दीपक मोहिते आदी उपस्थित होते.

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणे जिल्ह्यातल्या इतर बाजार समित्यांनी आले खरेदीदार व्यापाऱ्यांनी आल्याचे सौदे सरसकट करावेत, यासाठी आग्रह धरावा. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पुन्हा प्रतवारीचे भूत बसू देणार नाही. खरेदी सरसकट होणार नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून धाडसत्र सुरू करेल. त्यातून कायदा सुव्यवस्था निर्माण झाली तर प्रशासन जबाबदार असेल. -अनिल पवार, राज्य प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Implement the decision to buy Ginger everywhere, demands of Swabhimani Shetkari Saghtana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.