Immediately submit the proposal to the Government by panchayat | पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव त्वरित सादर करा : -मकरंद पाटील
पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव त्वरित सादर करा : -मकरंद पाटील

ठळक मुद्देवाईतील शासकीय आढावा बैठकीत महसूल विभागाला सूचना

वाई : ‘महाबळेश्वर, वाई, खंडाळा तालुक्यांत अतिवृष्टीने आलेल्या पुरात सर्वसामान्यांची घरे, शेती, विहिरी, पिके, जनावरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावेत. नुकसानग्रस्तांपर्यंत जास्तीत जास्त शासकीय मदत पोहोचवून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम सर्वांनी करावे,’ असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बोलविलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, बाळासाहेब भिलारे, पंचायत समितीच्या सभापती रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, वाईचे तहसीलदार रणजित भोसले, दशरथ काळे, महाबळेश्वरच्या तहसीलदार मीनल कळसकर, वाईच्या मुख्याधिकारी विद्या पोळ, मुख्याधिकारी शंकर गोरे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, राजेंद्र्र राजपुरे, पंचायत समितीचे सदस्य विक्रांत डोंगरे, मधुकर भोसले, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, राजेश गुरव, महादेव मसकर, शशिकांत पवार, मदन भोसले उपस्थित होते.

तिन्ही तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्याचा आढावा दिला. पुरामुळे झालेले नुकसान व पंचनाम्यांचे सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात ४५ कुटुंबे विस्थापित केली असून, ६१.३७ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. १५३ घरांचे अंशत: तर सात घरांचे पूर्ण नुकसान झाले. पंधरा गावांमध्ये पाणी पुरवठा योजना, सहा विहिरींचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या सोळा शाळांचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच तीन शेळ्या व सहा म्हसींचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार मीनल कळसकर यांनी दिली.

वाई तालुक्यातील मेणवली, खडकी, चिंधवली, सिद्धनाथवाडी येथील सुमारे ९८ कुटुंबे स्थलांतरित केली. २८७ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. ११ विहिरींचे नुकसान झाले असून, नऊ ठिकाणी जमिनी खचल्या आहेत. सतरा शाळांतील २८ खोल्यांचे नुकसान झाले आहे. तर अंदाजे ५,८०९ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. ६२ विद्युत खांब पडले असून, सर्व तालुक्यांत विद्युत पुरवठा सुरळीत सुरू आहे. काही गावांमध्ये बंधारे वाहून गेले आहेत. पाझर तलावांना गळती लागली आहे.

खंडाळा तालुक्यात तीन कुटुंबे स्थलांतरित केली असून, पाच पुलांचे नुकसान झाले आहे. तर २८२ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चौदा रस्त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी सांगितले.
यावर आमदार पाटील यांनी पूल, घर तसेच पिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून शासन दरबारी पाठवावेत. तसेच मयत झालेल्या युवकाबाबतही प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना केल्या. तिन्ही तालुक्यांत पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून, सर्वच विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीत चांगले काम केले असल्याचे पाटील यांनी नमूद केले.


भूस्खलनाबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांकडून अहवाल घ्या
यावर जे पूल वाहून गेले असतील किंवा रस्ते खराब झाले असतील, त्यांची तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरू करावी. तसेच त्यांचे नवीन प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवावेत. तसेच भूगर्भ शास्त्रज्ञांना तिन्ही तालुक्यांत जेथे जेथे भूस्खलन झाले आहे, ते दाखवून त्यांच्याकडून अहवाल घ्यावा, अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या.


 

Web Title: Immediately submit the proposal to the Government by panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.