'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 17:53 IST2025-10-26T17:36:53+5:302025-10-26T17:53:24+5:30
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी फलटण तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले.

'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे फलटण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी फलटण तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले. हा उद्घाटन सोहळा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांवर टीका केली.
मुंबईच्या ५० लाखांच्या ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत पोलिसांकडून बेड्या
यावेळी फडणवीस यांनी 'रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही पुर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहोत', असे सांगितले. "आज ज्या प्रचंड आणि अतिविशाल कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केले आहे, फलटणच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष केला ते आमचे मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, असं फडणवीस म्हणाले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले. यावेळी फडणवीस म्हणाले, आज मी इथे येऊ नये, यासाठी प्रयत्न झाले.
भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही
"आमची एका लहान बहीण डॉ. संपदा मुंडे यांचा अतिश्य दुर्दैवी मृत्यू झाला, त्या भगिनीने आत्महत्या केली. आत्महत्येचं कारणही आपल्या हातावर लिहून ठेवलं होतं. पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत, त्यांना अटक केली आहे. त्यामधील जवळपास सगळं सत्य बाहेर येत आहे. कुठल्याही परिस्थितीत आमच्या या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा निर्णय आम्ही घेतला. अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टी राजकारण घुसवलं जातं, तशाचप्रकारचा निंदनीय प्रयत्न झाला. काहीही कारण नसताना रणजितसिंह निबाळकर आणि सचिन पाटील यांचे नाव या प्रकरणात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. मला थोडी जरी शंका आली असती तरी मी कार्यक्रमाला आलो नसतो. अशा बाबतीत मी कधीच पक्ष, जात, व्यक्ती आणि राजकारण पाहत नाही,असंही फडणवीस म्हणाले.