लोकहिताविरोधात जाणारा कोणीही असो, मी आवाज उठवणार - उदयनराजे भोसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:15 IST2025-11-04T16:14:32+5:302025-11-04T16:15:16+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधिकरणाची बैठक

लोकहिताविरोधात जाणारा कोणीही असो, मी आवाज उठवणार - उदयनराजे भोसले
सातारा : ‘प्रतापगड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे गौरवशाली प्रतीक आहे. या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने येत असतात. परंतु, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना गडावर चढता येत नाही. त्यांच्यासाठी रोप-वे, फर्निक्युलर यंत्रणा तसेच सुसज्ज वाहन तळही आवश्यक आहे. या सुविधांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन उपलब्ध करून दिली जाईल,’ अशी ग्वाही खासदार तथा प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदयनराजे भोसले यांनी दिली.
सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची बैठक खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाचे सहअध्यक्ष शंभूराज देसाई दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, पुरातत्त्वचे सहसंचालक डॉ. विलास वाहने, प्राधिकरणाचे अशासकीय सदस्य मिलिंद एकबोटे, नितीन शिंदे, शरद पोंक्षे आदी उपस्थित होते.
जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेल्या प्रतापगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतापगड किल्ला प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. प्राधिकरणाची सोमवारी पहिली बैठक पार पडली. प्रतापगड किल्ला जतन व संवर्धनासाठी १२७ कोटी निधी मंजूर केला असून, यामधून संवर्धनाची विविध कामे करण्यात येणार आहेत.
त्यानुसार बैठकीत प्राधिकरणाकरिता कक्षाची स्थापना, प्रतापगड किल्ला संवर्धन कामाच्या निविदेस मान्यता, प्रकल्प सल्लागार नियुक्ती, लाईट अँड साऊंड शो स्क्रिप्ट, आकस्मिक खर्च, सुधारित शासन निर्णय, छत्रपती शिवाजी महाराज यांचे भित्तीचित्र, उर्वरित कामाचे नियोजन, पायथ्यालगत वाहनांसाठी जागा, विद्युत बस, ई-बस सुविधा आदी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
खासदार भोसले म्हणाले, ‘देवस्थानच्या मालकीचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असून, येथे जुन्या मोठ्या वृक्षांची तोड झाली आहे. वन विभागामार्फत तेथील वनराई, वृक्षराजी पुन्हा संवर्धित करण्यात यावी.’
मूळ ढाच्यात बदल होणार नाही : जिल्हाधिकारी
‘जिल्ह्यासाठी ३८१ कोटी ५६ लाखांचा एकात्मिक पर्यटन आराखडा मंजूर करण्यात आला असून, प्रतापगडाच्या जतन व संवर्धनासाठी १२७ कोटी रुपये मंजूर आहेत. प्रतापगडचे भौगोलिक स्थान पाहिले असता छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी व युद्धनीती दिसून येते. याची माहिती पुढील पिढीला होणे आवश्यक आहे. यासाठी प्रतापगडाचा संवर्धन विकास आराखडा राबविण्यात येत आहे. तथापि, किल्ल्याच्या मूळ ढाच्याला कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले.
लोकहिताविरोधात जाणारा कोणीही असो, मी आवाज उठवणार
बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मनोमिलन झालेलेच आहे. लोकांच्या हिताविरोधात जाणारा कोणीही असाे, मी आवाज उठवतो. जे लोकांच्या हिताचा विचार करतात, त्यांच्याशी मी सहमत आहे. लोक आपणाला ज्यावेळी निवडून देतात, त्यावेळी त्यांची अपेक्षा असते. लोकांना एकत्र ठेवणे महत्त्वाचे आहे.’