पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:35 IST2019-10-14T17:32:55+5:302019-10-14T17:35:46+5:30
पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यातील आनंदनगर येथे शनिवारी रात्री घडली.

पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीची आत्महत्या
सातारा : पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यातील आनंदनगर येथे शनिवारी रात्री घडली.
महेश सुभाष कदम (वय ४०, रा. आनंद नगर, हेम एजन्सी शेजारी, सातारा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महेश कदम हे औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये काम करत होते. मात्र, वारंवार ते कामावर गैरहजर राहात होते. त्यामुळे त्यांच्या हातात महिन्याचा पगार कमी येत होता.
परिणामी घर खर्च भागत नव्हता. त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद होत होते. दरम्यान, याच कारणावरून शनिवारी रात्री पती पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. त्यामुळे महेश कदम यांनी घरातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
कदम यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांच्या पत्नीने भांडणामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे.
त्यांना कोणताही आजार नव्हता, असेही पत्नीने पोलिसांना सांगितले आहे. या घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार देसाई हे अधिक तपास करत आहेत.