सातारा : आवड असेल तर सवड मिळते, अशी एक म्हण प्रचलित आहे. पण सध्याच्या कोरोनाच्या महामारीत छंद जोपासणे तसं अवघडच. मात्र याला काही पोलीस कर्मचारी अपवाद ठरले आहेत.
सध्याच्या कोरोना महामारीत बारा ते सोळा तासांची ड्यूटी केल्यानंतरही काही पोलीस कर्मचारी आपला छंद जोपासून कामाचा ताण हलका करत आहेत. छंदातूनच निर्माण झालेली ही कला इतर पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.
जिल्हा पोलीस दलात असे अनेक कलाकार दडलेले आहेत. त्यातील कोणी गायनाचा छंद जोपासला आहे तर कुणी विविध प्रकारची वाद्ये वाजवतात. काहीजण उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत तर काही लघुपट निर्मितीसारखे अवघड काम करताना दिसतात. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी नियमित व्यायाम छंद जोपासून आपल्या सहकाऱ्यांना सदृढ आरोग्याची प्रेरणा दिली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पोलिसांवरील कामाचा ताणही वाढला आहे. कर्तव्य करीत मनाची प्रसन्नता टिकवण्यासाठी अनेक पोलीस कर्मचारी स्वयंप्रेरणेने आपले छंद जोपासत आहेत. त्यातील हे काही प्रातिनिधिक पोलीस कर्मचारी आहेत.
महाविद्यालयीन जीवनापासून गायनाची आवड निर्माण झाली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर ही आवड कायम ठेवली आहे. कामाच्या व्यापात मधे कधीकधी आवड जोपासणे शक्य होत नाही मात्र ड्यूटीवरून घरी आल्यानंतर थोडा विरंगुळा म्हणून गाणी म्हणत असतो. गायनाची कला मी अद्यापही टिकवून ठेवल्यामुळे माझा उत्साह कायम वाढतो. कामावर असताना कसलाही ताण तणाव जाणवत नाही.
मारुती अडागळे
पोलीस दलात रुजू होण्याआधी गावाकडे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम करत होतो. या पथकामध्ये मी गीत गायन करायचो यातूनच गायनाची आवड निर्माण झाली. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील वर्षी कोरोनासंदर्भात जनजागृती करण्याच्या एका गाण्याची निर्मिती केली. यू-ट्यूबवर हे गाणे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरले आहे. कामातून वेळ काढून गाणे शिकत असून, शास्त्रीय संगीताची एक परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. गीत गायनातून मनाला प्रसन्न वाटते तसेच समाजप्रबोधन संदेश देता येतो.
-सूरज नडे
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. मला लहानपणापासून भजन-कीर्तन व संगीत सुगम संगीताची आवड आहे. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर सवड मिळेल तशी ही आवड जोपासली आहे. कीर्तनातून अभंग गायन, चाल, हार्मोनियम वाजवणे ही कला आत्मसात केली आहे. या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करतो. ही आवड जोपासली आणि मला मनाला आत्मिक समाधान मिळते. काम करण्यासाठीही उत्साह येतो आणि साहजिकच मन हलके होते.
- संतोष शेळके
शरीर निरोगी आणि सुदृढ असेल तर आपण कुठल्याही आव्हानांना सामना करू शकतो. २००८ पासून व्यायामाचा छंद जोपासला असून, यात कधीही खंड पडू दिला नाही. रोज सकाळी ७ ते ८.३० जीममध्ये वर्कआउट केल्यानंतरच माझ्या दिवसाची सुरुवात होते. सध्या लॉकडाउनमुळे जिम बंद असल्याने मी घरीच व्यायाम करतो. नियमित व्यायामाने मन प्रसन्न राहते, कामाचा ताण हलका होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीर निरोगी राहते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रत्येकाने नियमित व्यायाम करावा.
शरद बेबले