तब्बल पाच हजार रोमिओंची ‘हिरोपंती’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:53+5:302021-09-02T05:23:53+5:30

कऱ्हाड : भित्यापोटी ब्रह्मराक्षस, असं म्हणतात. युवतींचंही असंच होतं. त्या घाबरतात, संकुचित राहतात आणि घोळक्यानेच फिरतात. त्याला कारणही तसंच ...

'Hiropanti' of five thousand Romans! | तब्बल पाच हजार रोमिओंची ‘हिरोपंती’!

तब्बल पाच हजार रोमिओंची ‘हिरोपंती’!

कऱ्हाड : भित्यापोटी ब्रह्मराक्षस, असं म्हणतात. युवतींचंही असंच होतं. त्या घाबरतात, संकुचित राहतात आणि घोळक्यानेच फिरतात. त्याला कारणही तसंच आहे. आसपास भिरभिरणाऱ्या नजरा त्यांना भीती दाखवतात. गर्दीत असूनही असुरक्षिततेची जाणीव करून देतात. भीती दाखविणाऱ्या अशाच नजरा कऱ्हाडच्या पोलिसांनी गत तीन वर्षांत हेरल्या असून, ‘हिरोपंती’ करणाऱ्या तब्बल पाच हजार रोमिओंना निर्भया पथकाने कायद्याचा हिसका दाखविला आहे.

कऱ्हाडसह परिसरातील उपनगरांमध्ये पावलोपावली भेटणारे रोमिओ युवतींचा अक्षरश: पिच्छा पुरवतात. जिथे जावे तिथे अनपेक्षित नजरा युवतींच्या हृदयाचा ठोका चुकवतात. त्यामुळेच गर्दीत असूनही असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात घर करून राहते. किती अन् कुठपर्यंत घाबरायचं, या विचारातच झपाझप पावलं उचलत युवतींना घर गाठावं लागतं. बसस्थानकात बस फलाटावर लागली की युवक दांडगाई करीत सर्वांच्या अगोदर बसमध्ये चढतात. अशावेळी सॅक व ओढणी सांभाळत युवती कसाबसा प्रवास करतात. बसमध्येही त्यांना अंग चोरून उभे राहावे लागते.

बसस्थानकासह इतर सार्वजनिक ठिकाणीही हीच तऱ्हा असते. युवती एकाच ठिकाणी घोळका करून थांबलेल्या असतात. एकटी मुलगी क्वचितच दिसते. दोन किंवा अधिक मैत्रिणींना सोबत घेऊन युवती थांबते. अथवा पायी प्रवास करते. छेडछाड करणारे ‘रोमिओ’ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असले, तरी त्यांच्या अनपेक्षित नजरांना घाबरणाऱ्या युवती प्रत्येक युवकाकडे प्रश्नार्थकच पाहतात. त्यांच्या मनात भीती कायम घर करून असतेच.

- चौकट

सगळे सारखे नसतात; पण

‘त्यांना’ ओळखणार कसं..?

काहीजण एकट्या मुलीकडे विचित्र नजरेने पाहतात. त्यांच्या पाहण्याचीही युवतींना भीती वाटते. एकटीने फिरायचं तर त्यांच्या अंगावर काटा येतो. घरी पोहोचेपर्यंत युवती एकमेकींसोबत असतात. कॉलेजच्या बसथांब्यावर आणि बसस्थानकातही एकटीने फिरणे मुश्कील असते. सगळे सारखे नसतात. एका माळेचे मणी नसतात, हे मान्य; पण जे विकृत आहेत, त्यांना ओळखणार कसं? असा प्रश्न युवती उपस्थित करतात.

- चौकट

भीती वाटतेय... कॅमेरा पाहतोय का?

सोशल मीडियाचं ‘फॅड’ सध्या भलतंच वाढलंय आणि हे ‘फॅड’च महाविद्यालयीन युवतींची डोकेदुखी ठरत असल्याचे दिसते. काहीवेळा बसथांब्यावर, महाविद्यालय परिसरात तसेच रस्त्यावरही युवतींच्या नकळत त्यांच्या बोलण्याचे, चालण्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाते आणि ते रेकॉर्डिंग एडिट करून सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केले जाते. त्यामुळे मोबाईलच्या कॅमेऱ्याचीही भीती वाटत असल्याचे युवतींचे म्हणणे आहे.

- चौकट

कोण कट मारतंय... तर कोण बघतंय...

युवतींना पाहून सुसाट दुचाकी चालविण्याचे प्रकार सर्रासपणे पाहायला मिळतात. ॲक्सिलेटर वाढवून वेडीवाकडी वळणे घेत अनेकजण युवतींना ‘कट’ मारून जातात. त्यांचा हा ‘स्टंट’ कोणी पाहतही नाही; पण कोणीतरी पाहावं म्हणून केलेला हा ‘स्टंट’ एखाद्या मुलीच्या किंवा स्वत:च्याही जिवावर बेतू शकतो, याचंच त्यांना भान नसतं, हे दुर्दैव.

- चौकट

... अशी होते कारवाई

१) निर्भया पथक उपअधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारित काम करते.

२) पथकासाठी स्वतंत्र शासकीय वाहन आहे.

३) या पथकाची गर्दीच्या ठिकाणांवर गस्त असते.

४) छेडछाड करणाऱ्यांना हेरून त्यांच्यावर कारवाई केली जाते.

५) तक्रार आल्यासही या पथकाकडून कारवाई होते.

६) कॉलेज परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर वॉच असतो.

- चौकट

कारवाईची सरासरी

दंडात्मक कारवाई : १९ टक्के

प्रबोधन, समज : १४ टक्के

प्रतिबंधात्मक कारवाई : ३९ टक्के

न्यायालयात दाखल : २८ टक्के

आकडेवारी चौकट येणार आहे.

०१कऱ्हाड०१ प्रतीकात्मक

Web Title: 'Hiropanti' of five thousand Romans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.