कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला
By प्रमोद सुकरे | Updated: September 16, 2022 15:34 IST2022-09-16T15:33:32+5:302022-09-16T15:34:20+5:30
महाबळेश्वर येथे गेल्या चोवीस तासात तब्बल ११८ मिलीमीटर पावसाची नोंद

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला
कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात प्रतिसेकंद ३० हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरण ९९ टक्के भरले असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे साडे चार फुटांनी उघडण्यात आले आहेत. पायथा वीजगृह आणि दरवाजांतून प्रतिसेकंद ४२,३३१ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने कोयना नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणि धरणात पाण्याची आवक वाढल्याने गुरूवारी रात्री १० वाजता एक फुटावर स्थिर असणारे धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फुटाने उघडण्यात आले. तसेच शुक्रवारी सकाळी १० वाजता दरवाजे साडे चार फूट करण्यात आले. पायथा वीजगृहातून १०५० आणि वक्र दरवाजांतून ४१,२८१, असा एकूण ४२,३३१ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर येथे गेल्या चोवीस तासात तब्बल ११८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच कोयनानगर येथे ६२ मिलीमीटर आणि नवजा येथे ६१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. परतीच्या पावसामुळे धरण ९९ टक्के भरले आहे. धरणात १०४.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे धरणात प्रतिसेकंद ३० हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.