अगोदर भाषण, नंतर उद्घाटन; मंत्री जयकुमार गोरे यांना उशीर झाल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई ताटकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:35 IST2025-09-12T18:35:17+5:302025-09-12T18:35:36+5:30
सीईओंच्या कामाचे काैतुक..

अगोदर भाषण, नंतर उद्घाटन; मंत्री जयकुमार गोरे यांना उशीर झाल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई ताटकळले
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात ग्रामविकास विभागाचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम कार्यशाळेला पालकमंत्रीशंभूराज देसाई हे वेळेत उपस्थित झाले. पण, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना वेळ लागला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी प्रथम भाषण करून गोरे यांच्या अभियानाला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मंत्री गोरे आल्यावर दोघांनी मिळून कार्यशाळेचे उद्घाटन केले. यानंतरच पालकमंत्री पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू होत आहे. यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा सातारा जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात होती. या कार्यशाळेला जिल्ह्यातून शेकडो सरपंच आलेले. पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.
कार्यशाळेच्या ठिकाणी पालकमंत्री अगोदर आले होते. मात्र, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना मुंबईवरून येणार असल्याने उशीर झाला. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे गेला. यादरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर पालकमंत्री बोलण्यासाठी उठले. कार्यक्रम ग्रामविकास विभागाचा आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून अभियान सुरू आहे. ते आले की आपण दीपप्रज्वलन करून उद्घाटन करू. मला पुढील कार्यक्रम असल्याने आता बोलतो असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी उपस्थित सरपंच आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
पालकमंत्री देसाई यांचे मार्गदर्शन सुरू असतानाच ग्रामविकास मंत्री गोरे यांची एंट्री झाली. त्यानंतर पालकमंत्री आणि मंत्री गोरे यांनी एकत्रित दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन केले. तसेच घडीपत्रिकेचे विमोचन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव पार पाडणाऱ्या गावांचाही दोघांच्या हस्ते सन्मान झाला. यानंतर पालकमंत्री देसाई पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले, तर यानंतर मंत्री गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सीईओंच्या कामाचे काैतुक..
कार्यशाळेत पालकमंत्री देसाई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या कामाचे काैतुक केले. तसेच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतल्यास जिल्हा स्वच्छ होईल हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. तर मंत्री गोरे यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन आणि त्यांचे पती कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनी सातारा आणि कोल्हापूर जिल्हे अभियानात राज्यात पुढे राहतील असा शब्द दिला आहे, असे सांगितले. तसेच नागराजन यांचे कामाबद्दल काैतुकही केले.