मैदाने अन् खेळ झाला लॉक; मुलांसाठी मोबाईल जॅकपॉट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:43 IST2021-09-05T04:43:37+5:302021-09-05T04:43:37+5:30
मुलांच्या मनावर खेळाची आवड ही कोणी बाहेरुन लादत नाही. तर ती स्वयंस्फूर्तच असते. ही उपजत आवड त्यांना एका जागी ...

मैदाने अन् खेळ झाला लॉक; मुलांसाठी मोबाईल जॅकपॉट...
मुलांच्या मनावर खेळाची आवड ही कोणी बाहेरुन लादत नाही. तर ती स्वयंस्फूर्तच असते. ही उपजत आवड त्यांना एका जागी स्वस्थ बसू देत नाही. त्याला काहीतरी हालचाल करायला लावतेच. तसेच मुलांत मोठ्यांचे अनुकरण करण्याची ओढ पहिल्यापासून असतेच. त्यामुळे खेळाकडे मुलांचा ओढा हा वाढतच जातो. खेळ म्हणजे मुलांच्या शिक्षणाची निसर्गाने केलेली व्यवस्थाच होय. मुलांची वाढ ही त्यांच्या खेळावरच अवलंबून असते. खेळ हे मनाच्या व शरीराच्या निरोगीपणाचे लक्षण असतात. खेळापासून त्यांना दूर केले की ती चिडखोर, तुसडी, एकलकोंडी बनतात, असे मानसशास्त्र सांगते. हेच आता सिध्द् होऊ लागले आहे.
आपल्याकडे कोरोना विषाणूचं संकट आहे. हे संकट अजूनही पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांना घराबाहेर पडायला जागाच नाही. शाळेतील शिक्षण थांबले तसेच तेथील मैदानावरील खेळावरही निर्बंध आले आहेत. बाहेरील मैदानावर जायचे झाले, तर तेथेही प्रवेश नाही. त्यामुळे मुलांना घरातच बसून राहावं लागतंय. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ते ठराविक वेळच सुरू असते. हे शिक्षणही मोबाईलवरूनच घ्यावं लागतं. टीव्हीवरील कार्यक्रम पाहायचे झाले तर फारवेळ मुले समोर बसत नाहीत. त्यामुळे मोबाईलच मुलांचा खेळ आणि मित्र झाल्याचे दिसून येत आहे.
दिवसभर मुले घरात असतात. अशावेळी आई नाही तर वडिलांचा मोबाईल हातात घ्यायचा आणि दिवसभर त्यात खेळत बसायचे, हाच मुलांचा सध्या शिरस्ता झाला आहे. पालकांनाही मुलांना अधिक बोलता येत नाही. कारण, दिवसभर घरात बसून मुले वैतागलेली असतात. त्यातच मुलाने अधिक वेळ मोबाईल घेतला, तर पालक ओरडतात. याचा परिणाम मुले नाराज व रुसण्यात होतो. यावरून मुले म्हणतातही, मला खेळायला बाहेर जाऊ देत नाही. मग, मोबाईलवर खेळलो तर काय झाले? त्यामुळे पालक मुलांना बोलायचे सोडून देतात. परिणामी पालकांचा मोबाईल अधिक करून मुलांच्याच हातात राहतो. मुलांचे मैदानी खेळ बंद झाल्याने त्यांच्याकडून मोबाईलचा वापर वाढला आहे. त्याचबरोबर जागेवर बसून असल्याने लठ्ठपणाची समस्याही अनेकांत दिसून येऊ लागली आहे, हे निश्चित.
चौकट :
खेळाचा विसर पडल्याने बालपण विसरली...
लहान मुलांचा मेंदू अतिशय कार्यक्षम असतो. आपण समोर ठेवू ती गोष्ट ती आत्मसात करायला लागतात. कोरोनामुळे सध्या मैदानी खेळाचा विसर पडल्याने ती बालपण हरवून बसली आहेत. मोबाईलमध्ये खेळणे हे आरोग्याच्यादृष्टीने हानिकारक आहे. तरीही सध्या मुले मोबाईलमध्ये विविध गेम खेळत असतात. त्यासाठी खेळ डाऊनलोड करण्यातही ते माहीर झाले आहेत. शेकडो व्हिडिओ गेम्स काही क्षणात डाऊनलोड होतात. आकर्षक डिझाईन, जिवंतपणाचा देखावा, क्षणिक व भौतिक सुखाचा आनंद देणारे खेळ तासनतास खेळले जातात. अनेक तास खेळूनही मुलांचे मन भरत नाही. खेळाच्या नादात भान राहत नाही. सतत मोबाईल गेम्स खेळू वाटतात. बॅटरी संपून मोबाईल बंद झाला की मुलांचा चिडचिडेपणा सुरू होतो.
- नितीन काळेल
..................................................................