गोविंदा मंडळांना प्रतीक्षा मुलींच्या संघाची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:36 IST2021-08-29T04:36:56+5:302021-08-29T04:36:56+5:30
दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजेशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, ...

गोविंदा मंडळांना प्रतीक्षा मुलींच्या संघाची!
दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजेशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरून एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याल फोडण्याचा प्रयत्न तरुणांचे गोविंदा पथक करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एकमेकांच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. मुंबईत गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात. अनेक मंडळे अशी आहेत, ज्यात केवळ मुलीच आहेत. या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत, थरांवर थर लावून हंडी फोडतात.
गोविंदांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात गोपिका पथकांचे अस्तित्वचे नाही. याला सुरक्षितता हे सर्वाधिक मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे या गर्दीत काही अपप्रकार होत असल्याने, कुटुंबातूनच मुलींना यात सहभागी होण्यास अडविले जाते. याबरोबरच दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या मनोऱ्यावरून पडून अपघात होणे आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. असं काही मुलींच्या बाबतीत होऊ नये, या काळजीनेही त्यांना या उत्सवात सहभागी होण्यास मज्जाव केला जातो.
कोट :
गोपिका पथकात मुलींना सहभागी होऊ द्यायला मोजकेच पालक तयार होतात. एका पथकात किमान १५ युवतींचा सहभाग असणं आवश्यक आहे, पण अपघात आणि असभ्य व्यवहार होईल, या भीतीने पालकच त्यांना पथकात येऊ देत नाहीत. दहीहंडी आपला पारंपरिक उत्सव असून, त्यात सहभागी होण्यासाठी तरुणींसह त्यांच्या पालकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.
- स्मिता देशमुख, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष, सातारा.
चौकट :
अनेकदा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणारे गोविंदा पथक थरावरून कोसळून जखमी होतात. हा प्रसंग फोडणाऱ्याच्या जीवावरही बेतू शकतो. २०१२ साली सुमारे २२५ गोविंदा जखमी झाले होते. यासाठी महाराष्ट्र सरकारने काही नियम तयार केले आहेत. २०१४ मध्ये राज्य शासनाने १२ वर्षांखालील मुलांनी दहीहंडीत सहभागी होऊ नये, असे फर्मान काढले. यानंतर, उच्च न्यायालयाने दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंद १८ वर्षे पूर्ण झालेला पाहिजे, असे नमूद केले. २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीत सहभागी होता येणार नाही. थरांवरच्या उंचीबाबतही आधी न्यायालयाने निर्बंध घातले होते, पण २०१७ मध्ये ते शिथिल करण्यात आले.
असा रचला जातो मनोरा..!
उंचीवर बांधलेल्या दहीहंडीला फोडण्यासाठी मानवी मनोरा तयार करावा लागतो. या मनोऱ्याचा पाया रचण्यासाठी दणकट व्यक्तिंची गरज असते. खालच्या थरात उभे असणाऱ्यांच्या मांडी आणि खांद्यावर पाय ठेऊन वरचा थर रचला जातो. थर जसा वरवर जाईल, तसे कमी वजनाचे गोविंदा उंचीवर चढू लागतात. खालच्या थरात असणारे गोविंदा एकमेकांच्या खांद्याला पकडून थर राखत असतात. यात कोणाचाही पाय लटपटला किंवा वरती जाताना हात निसटला, तर अख्खा थर खाली कोसळण्याची भीती असते, ही खबरदारी घेऊन मगच थर रचला जातो.
- प्रगती जाधव-पाटील