राज्यपाल सातारा दौऱ्यावर, महाबळेश्वरमध्ये रस्त्याच्या कामामुळे पर्यटक वाहतूक कोंडीने त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:07 IST2025-10-24T17:06:30+5:302025-10-24T17:07:41+5:30
वाहतुकीचा तासन्तास खोळंबा होत असून पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

राज्यपाल सातारा दौऱ्यावर, महाबळेश्वरमध्ये रस्त्याच्या कामामुळे पर्यटक वाहतूक कोंडीने त्रस्त
महाबळेश्वर : दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटक महाबळेश्वरात दाखल होत असतानाच राज्यपाल आचार्य देवव्रत हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यपालांच्या दौऱ्यामुळे महाबळेश्वरमध्ये शहरातील मुख्य रस्त्यांवर अचानक डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. यामुळे वाहतुकीचा तासन्तास खोळंबा होत असून पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
बगीचा कॉर्नरपासून माखरिया गार्डनपर्यंतच्या मुख्य मार्गावर सकाळपासून डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबल्याने स्थानिक नागरिकही हैराण झाले आहेत. दिवाळी सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरात रोज ५० ते ६० बसेस आणि हजारो खासगी गाड्या दाखल होत असताना, अशावेळी रस्ते दुरुस्तीचं काम सुरू केल्याबद्दल पर्यटन व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. पर्यटकांना आणि स्थानिकांना दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे.
शहरातील हॉटेल्स, लॉज पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. लॉज, हॉटेल्सचे दर चांगलेच वाढले आहेत. टॅक्सींची टंचाई निर्माण झाल्याने अनेक पर्यटकांना स्थानिक पर्यटनस्थळांना जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. धुळीने माखलेले आणि खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवास त्रासदायक झाला आहे. वाहतूक कोंडी, पार्किंगची अपुरी सोय आणि अरुंद रस्त्यांमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.
राज्यपालांचा दौरा खालीलप्रमाणे
राज्यपाल आचार्य देवव्रत हे दि २५ व २६ ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या, शनिवार दि. २५ रोजी दुपारी १२.३० वा. राजभवन, महाबळेश्वर येथे आगमन होणार आहे. दुपारी १२.३० ते २.१५ राखीव वेळ असणार आहे. दुपारी २.१५ वा. महाबळेश्वर येथून साताराकडे प्रयाण. दुपारी ३.४५ वा. कास पठार येथे आगमन. दुपारी ४ वा. कास पठार येथून प्रयाण. दुपारी ४.१५ वा. मुनावळे, ता. जावळी येथे आगमन. ४.१५ ते ४.२५ राखीव. ५.४५ ला मुनावळे येथील वॉटर स्पोर्टस ॲकटिव्हिटीस उपस्थिती लावणार आहेत. सायंकाळी ६ वा. मुनावळे येथून प्रयाण. सायं ७.३० वा. महाबळेश्वर येथे आगमन व मुक्काम असणार आहे.
रविवारी (दि. २६) सकाळी महाबळेश्वर येथील आर्थर सिट पॉईंट ला भेट. सकाळी ९.३० ते ११ वा. आर्थर सिट पॉईंट ची पहाणी. सकाळी ११ वा. आर्थर सिट पॉईंट येथून प्रयाण. ११.१० ते ११.२० सावित्री पॉईंट येथे भेट. ११.४० वा. इलिफनस्टन पॉईंटला भेट देवून पहाणी. दुपारी १२ वा. कॉटेज पॉईंटची पहाणी. दुपारी १२.४० वा. कॉटेज पॉईंट येथून प्रयाण करुन दुपारी १ वा. पुन्हा राजभवन महाबळेश्वर येथे येणार. दुपारी २.३० वा. वेण्णा लेक, 3 वा. टेबल लँड पाचगणी येथे ३.४५ पर्यंत टेबल लँडची पहाणी करुन पुण्याकडे रवाना होणार.