टँकरने पाणी द्या; अन्यथा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:49+5:302021-06-22T04:25:49+5:30

मायणी : येथील अनेक भागांमध्ये ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार ...

Give water by tanker; Otherwise Handa Morcha | टँकरने पाणी द्या; अन्यथा हंडा मोर्चा

टँकरने पाणी द्या; अन्यथा हंडा मोर्चा

मायणी : येथील अनेक भागांमध्ये ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीने टँकरने पाणीपुरवठा करावा, अन्यथा हंडा मोर्चा काढण्यात येईल, असे निवेदन ग्रामपंचायत सदस्य अर्चना जाधव यांनी सरपंच, ग्रामसेवकांना दिले आहे.

अर्चना जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, इंदिरानगर, कचरेवाडी, नदाफ कॉलनी, वडूज रोड, मरडवाक कॉलनी, श्रीराम कॉलनी, यशवंतनगर, शिक्षक कॉलनी व चांदणी चौक परिसर आदी भागांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना येरळवाडी तालुका खटाव येथील मध्यम प्रकल्पावर असलेल्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत आहे. गेल्या मे महिन्यामध्ये या प्रादेशिक नळपाणीपुरवठाची विद्युत मोटार जळाल्यामुळे वीस ते बावीस दिवस या भागांतील पाणीपुरवठा बंद होता. त्या वेळी ग्रामस्थांनी सहाशे रुपयेप्रमाणे टँकर विकत घेतला होता.

सध्या मायणी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. परिसरामध्ये चारी बाजूला पाणीसाठा निर्माण झाला आहे. येथील ब्रिटिशकालीन तलावही गेल्या दहा दिवसांपासून भरुन वाहत आहे. असे चहूबाजूला पाणी असतानाही ग्रामस्थ सध्या कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी पुन्हा येरळवाडी मध्यम प्रकल्पातील पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटर बिघडल्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे. विद्युत मोटर दुरुस्त होऊन पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत सदर भागातील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अन्यथा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही.

निवेदन सरपंच सचिन गुदगे देण्यात आले. या वेळी उपसरपंच आनंदा शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य विनोद पवार, रणजित माने, गजानन माळी उपस्थित होते. निवेदनामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रणजित माने, विनोद पवार, गजानन माळी, पापालाल नदाफ, वैशाली पवार, मनीषा श्रीखंडे यांच्या सह्या आहेत.

Web Title: Give water by tanker; Otherwise Handa Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.