आधी खड्डेमुक्त रस्ते द्या, मगच टोल भरणार; साताऱ्यातील बैठकीत निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 06:28 IST2019-10-29T00:24:09+5:302019-10-29T06:28:43+5:30
राष्ट्रीय महामार्गावर सध्याच्या चौपदरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

आधी खड्डेमुक्त रस्ते द्या, मगच टोल भरणार; साताऱ्यातील बैठकीत निर्धार
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करा व महामार्गावर जोपर्यंत सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत टोल न भरण्याचा निर्धार रविवारी साताºयात करण्यात आला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील गैरसोयी व द्यावा लागणारा टोल याअनुषंगाने चळवळीची दिशा ठरविण्यासाठीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी साताºयातील शाहूनगरमध्ये झाली.
राष्ट्रीय महामार्गावर सध्याच्या चौपदरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. सहापदरीकरणाचे काम रखडले असले तरी गेल्या काही वर्षांपासून सहापदरी रस्त्याचा टोल घेतला जात आहे. या रस्त्यात सुधारणा होत नाहीत तसेच सुविधा वाढत नाही, तोपर्यंत टोल घेऊ नये, अशी मागणी सातारा जिल्हावासीयांतून जोर धरू लागली आहे.
पंतप्रधानांना निवेदन देणार
‘महामार्ग खड्डेमुक्त केल्यावरच टोल घ्या’ या मागणीसाठी पंतप्रधान, भारतीय रस्ते विकास प्राधिकरण, खासदार-आमदार व सर्व संबंधितांना निवेदन देण्याचे ठरले.