‘घोरपडें’च्या गळ्यात अखेर ‘कमळ’चा मफलर !

By Admin | Updated: August 18, 2016 23:34 IST2016-08-18T23:34:19+5:302016-08-18T23:34:22+5:30

कऱ्हाड उत्तर : ‘स्वाभिमानी’ नेता भाजपच्या गळाला; आता जाहीर प्रवेश कार्यक्रमाची प्रतीक्षा !

'Gharapadne' necklace ends with muffler! | ‘घोरपडें’च्या गळ्यात अखेर ‘कमळ’चा मफलर !

‘घोरपडें’च्या गळ्यात अखेर ‘कमळ’चा मफलर !

प्रमोद सुकरे -- कऱ्हाड  -गेली काही महिने कऱ्हाड उत्तरेत ‘शिट्टी’ वाजविणाऱ्या एका ‘स्वाभिमानी’ नेत्याला ‘कमळ’ खुणावत होतं. हे नेतृत्व भाजपने टाकलेल्या ‘गळाला’ लागणार का? याचा साऱ्यांनाच ‘घोर’ पडलेला; पण सोमवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात घोरपडेंच्या गळ्यात भाजपचे चिन्ह असणाऱ्या ‘कमळ’ चा मफलर पाहायला मिळाला आणि मनोजदादांची ‘वाट’ आणि ‘चाल’ कमळाच्या दिशेनेच सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
‘लोकमत’ने दि. ९ आॅगस्टच्या अंकात ‘स्वाभिमानीला कमळ खुणावतंय’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या बातमीला त्यामुळे दुजोराच मिळाला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड उत्तरेत स्वाभिमानीची ‘शिट्टी’ वाजवत ऐनवेळी मैदानात ‘एन्ट्री’ केलेल्या मनोज घोरपडेंनी काँगे्रस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना चांगलेच पळायला लावले. त्यांना यशाप्रत पोहोचता आले नसले तरी मतदार संघातील प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी शिट्टीचा आवाज पोहोचविला, हे निश्चित !
निवडणूक निकालानंतर राज्यात भाजप-सेना आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे स्वाभिमानीची कास धरलेल्या ‘घोरपडें’च्या सरकारकडून तर उत्तरेतील कार्यकर्त्यांच्या घोरपडेंकडून अपेक्षा वाढल्या; पण भाजपने मित्रपक्षाला सुरक्षित अंतरावर ठेवण्याचे शास्त्र अवलंबिल्याने दस्तुरखुद्द सदाभाऊंना विधानपरिषदेचा गड सर करताना अन् लालदिवा मिळविताना गेलेला वेळ, झालेला त्रास घोरपडे पाहत होते. त्यामुळे मित्र पक्षात राहण्यापेक्षा मुख्य प्रवाहात जाणेच बरे, असा विचार त्यांच्या मनात काही महिन्यांपासून घोळत असल्याचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे सदाभाऊ खोत हे मंत्री झाल्यावरही उत्तरेत ‘शिट्टी’चा आवाज वाढलेला दिसला नाही.
भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे कऱ्हाडचे नगरसेवक विक्रम पावसकर यांनी घेतल्यापासून जिल्ह्यात पक्षवाढीकडे त्यांनी चांगलेच लक्ष घातले आहे. म्हणून तर लोणंद नगरपंचायत निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि त्यात अपेक्षेपेक्षा चांगले यशही मिळवून दाखविले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढायला चांगलीच मदत झाली आहे.
कऱ्हाड तालुका हे तर पावसकरांचे होमपीच! या होमपीचवर आपला संघ अत्यंत सक्षम असला पाहिजे, ही त्यांची धारणा स्वभाविकच आहे. दक्षिणेत पावसकरांसह राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील आदींंची भक्कम फळी कार्यरत आहे. पण, उत्तरेत एखादं सक्षम युवा नेतृत्व हाताशी घेतल्याशिवाय ‘कमळा’ची मुळे घट्ट करता येणार नाहीत. हे जाणून त्यांनी काहींना गळ टाकला. त्याला मुळताच द्विधा मन:स्थितीत असलेले घोरपडे लागल्याची चर्चा महिनाभरापासून मतदार संघात आहे.
मनोज घोरपडेंनी गेली महिनाभर गावोगावच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची मते आजमावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील आणि जाहीर प्रवेश कार्यक्रम पाहायला मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती व आहे. पण तत्पूर्वीच अपशिंगे, ता. सातारा येथे १५ आॅगस्टनिमित्त झालेल्या एका भाजपच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या बरोबरीने त्यांच्याही गळ्यात ‘कमळ’चा मफलर पाहायला मिळाला.
त्यामुळे घोरपडेंची वाटचाल कमळाच्याच दिशेने असल्याचे दिसून आले.


आता जाहीर कार्यक्रमाची प्रतीक्षा !
मनोज घोरपडे यांची भाजपकडील वाटचाल आता स्पष्ट झाली असून, साऱ्यांनाच त्यांच्या जाहीर प्रवेश कार्यक्रमाची प्रतीक्षा लागली आहे. गेल्या आठवड्यात रायगाव (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा झाला. यावेळी जाहीर प्रवेश कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्यात आली असल्याचे खात्रीशीर समजते. त्यांनी गणेशोत्सवानंतरची तारीख निश्चित करण्याचे स्पष्ट संकेत दिले असून, सप्टेंबर महिन्यामध्ये जाहीर प्रवेश कार्यक्रमाला मुहूर्त मिळेल, अशी खात्री आहे.



नाईकांचीही भूमिका महत्त्वाची!
शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक हे घोरपडेंचे पाहुणे आहेत. त्यामुळे मनोज घोरपडेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात तेही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नाईकांनी स्वत: मुख्यमंत्री फडवणीस व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी मनोज घोरपडे यांची बैठक घडवून दिल्याचे वृत्त आहे.

Web Title: 'Gharapadne' necklace ends with muffler!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.