गावोगावची मंदिरे खुली... पण यात्रा ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST2021-01-10T04:30:29+5:302021-01-10T04:30:29+5:30
वाई : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर लॉकडाऊन टप्प्याटप्याने हटविण्यात आला. त्यातून मंदिरेही खुली केली मात्र यात्रांना बंदी कायम आहे. ...

गावोगावची मंदिरे खुली... पण यात्रा ‘लॉकडाऊन’
वाई : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर लॉकडाऊन टप्प्याटप्याने हटविण्यात आला. त्यातून मंदिरेही खुली केली मात्र यात्रांना बंदी कायम आहे. मांढरदेव, खंडोबाची पाली या मोठ्या यात्रांबरोबर अनेक छोट्या मोठ्या जत्रा, यात्रा, उत्सव, उरुस रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला आहे.
कोरोनामुळे मार्चपासूनच्या सर्व यात्रा-जत्रा बंद आहेत. यात्रांवर अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. यात्रांमध्ये मिठाई, खेळणी, कपडे, करमणूक आदी दुकाने थाटत असतात. यात्रेनिमित्त शहरांत गेलेले चाकरमाने आवर्जून कुटुंबासह गावी येतात.
ग्रामदैवत, कुलदैवताचे दर्शन घेतात आणि पारंपरिक यात्रा उत्सवात सहभागी होतात. बैलगाड्यांच्या शर्यती, भारूड, लोकनाट्य यासारखे मनोरंजनाचे कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा आणि पुन्हा रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे उत्सवाचे स्वरूप असते. बैलगाड्यांच्या शर्यती बंद असल्याने गावोगावच्या यात्रांची गर्दी कमी झाली आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी ग्रामदैवताची पालखी, ढोल-ताशा व हारतुरे करणे आदी काम मर्यादित आहे.
टाळेबंदीनंतर उद्योग-व्यवसायांबरोबर धार्मिक स्थळे खुली केली. मात्र, धार्मिक कार्य तसेच मंदिरातील उपस्थितीवर मर्यादा कायम असल्यामुळे यात्रा- जत्रा उत्सव बंदच राहिले आहेत.
हंगाम सुरू झाला असला तरी कोरोनाच्या भीतीमुळे धार्मिक कार्यक्रम देवस्थान ट्रस्टच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडले जात आहेत. देवस्थान समितीच्या बैठका घेऊन ग्रामदेवांच्या यात्रा रद्द करण्याचे निर्णय होत आहेत. प्रशासनाने मंदिरे खुली केली, पण यात्रा-जत्रा लॉकडाऊनच आहेत. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी धोका संपलेला नाही. नागरिकांमध्ये आजही आजाराची मोठ्या प्रमाणात भीती आहे. समाजामध्ये जनजागृती झाली असली तरी गावच्या देवस्थान कमिट्या
स्वयंस्फूर्तीने बैठका घेऊन यात्रा रद्द करीत आहेत. यात्रा नियोजन ,पोलीस
बंदोबस्त आदीमुळे प्रशासनाचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे.
कोट :
लोककलावंत अडचणीत
यात्रा आणि तमाशा यांचे अनोखे नाते आहे. यात्रांमध्ये
तमाशा, नाटक, चित्रपट दाखविले जातात. लोकनाट्यामुळे लोककलावंतांना रोजगार उपलब्ध होतो.
त्यातून लोककला टिकून राहिल्या. मागील वर्षांपासून तमाशा उद्योग बंद असल्याने फड मालकांवर
उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा कलावंतांना अगोदर उचल, कार्यक्रमासाठी
दर्जेदार साहित्य, वाद्य, लायटिंगसह अन्य वस्तूंची खरेदी करावी लागते. हा
सर्व खटाटोप केल्यानंतर तमाशाचा फड उभा राहतो. त्यातूनही अनेकदा नैसर्गिक
संकटामुळे कार्यक्रम रद्द होतात. त्याचाहा भूर्दंड फडमालकांवरच येऊन पडतो.
चौकट
:
कुस्त्यांच्या मैदानांना ग्रहण
यात्रानिमित्ताने नामवंत कुस्त्यांची मैदाने भरत असतात. कोरोनाचे ग्रहण कुस्ती क्षेत्र व मल्लांनाही लागल्याचे दिसत आहे. मोठ्या गावांतील यात्रांच्या अनुषंगाने नामवंत मैदाने लवकर होणार नसल्याने मोठा फटका बसणार आहे. नवोदित पैलवानांना सुरुवातीच्या काळात यात्रेच्या मैदानातून पुढे
जाण्याचा मार्ग सापडतो व आपल्यातील गुणांचा आवाका येतो.
कोरोनामुळे कुस्ती केंद्र बंद, कुस्त्यांची मैदाने रद्द, वर्षभराची मेहनत वाया गेली. खुराक
बंद, संचारबंदी असल्याने अनेक महिने व्यायाम बंद असल्याने व्यायामावर गदा आली आहे. यामुळे बुद्धी आणि यष्टीचा खेळ अडचणीत आहे.
फोटो
०९वाई यात्रा
मांढरगडावरील काळूबाईच्या यात्रेला दरवर्षी लाखो भाविक येतात, पण यंदा यात्रा रद्द केली आहे. (संग्रहित छाया)