महाबळेश्वरमधील लिंगमळा परिसरात गव्यांचा धुडगूस, स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 18:04 IST2022-12-10T18:04:16+5:302022-12-10T18:04:41+5:30
गव्याचे कळप स्ट्रॉबेरी शेतीला लक्ष्य करीत आहेत.

महाबळेश्वरमधील लिंगमळा परिसरात गव्यांचा धुडगूस, स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान
महाबळेश्वर : लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरीच्या शेतीवर गव्याच्या कळपाने हल्ला केला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या स्ट्रॉबेरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात रानगव्यांची संख्या झपाट्याने मोठ्या वाढू लागली आहे. या गव्यांच्या उपद्रवामुळे महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शेती धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यावर्षीचा पाऊस उशिरापर्यंत लांबल्यामुळे महाबळेश्वर ते अवकाळी या भागात स्ट्रॉबेरी पिकाची उशिरा लागवड करण्यात आली. त्यामुळे अजूनपर्यंत या भागातील स्ट्रॉबेरी पिकाला फळे आली नाहीत. अशातच गव्याचे कळप स्ट्रॉबेरी शेतीला लक्ष्य करीत आहेत.
मंगळवारी मध्यरात्री लिंगमळा येथे राहणारे संतोष धनावडे, सुनील बावळेकर, चद्रकांत धनावडे, दीपक बावळेकर व इतर अनेक शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये २० ते २५ गव्यांचा कळप शिरला होता. कळपातील गव्यांनी स्ट्रॉबेरीची रोपे खाऊन टाकली. स्ट्रॉबेरी पिकाला माती लागू नये व खराब होऊ नये म्हणून हजारो रुपये खर्च करून त्यावर काळा प्लास्टिकचा पडदा टाकला होता. त्याचेही या रानगव्यांनी मोठे नुकसान केले आहे.
लिंगमळा परिसरातील ५० ते ६० एकर शेती या गव्यांनी तुडवल्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतामध्ये शेतकरी आले असता त्यांना रानगव्यांनी केलेल्या शेताच्या नुकसानीची माहिती मिळाली. वन वनविभागाने या स्ट्रॉबेरी पिकाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संतोष बावळेकर, शरद बावळेकर यांनी वन विभागाकडे करू लागले आहेत.