फुटक्या कालव्यांतून गाजरगवताचे सिंचन, अनागोंदी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 11:25 IST2019-05-04T11:22:57+5:302019-05-04T11:25:53+5:30
सातारा जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले कालवे व पोटपाटांची दुरवस्था झाली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे उपलब्ध पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असताना फुटक्या कालव्यांमुळे आजूबाजूच्या गाजरगवताचेच सिंचन होताना दिसत आहे. जिल्ह्यातील कोयनेसह धोम, कण्हेर, उरमोडी, धोम बलकवडी, तारळी, येरळवाडी या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.

फुटक्या कालव्यांतून गाजरगवताचे सिंचन, अनागोंदी कारभार
सातारा : जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले कालवे व पोटपाटांची दुरवस्था झाली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे उपलब्ध पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असताना फुटक्या कालव्यांमुळे आजूबाजूच्या गाजरगवताचेच सिंचन होताना दिसत आहे.
जिल्ह्यातील कोयनेसह धोम, कण्हेर, उरमोडी, धोम बलकवडी, तारळी, येरळवाडी या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.
कण्हेर धरणातून उन्हाळीचे एक आवर्तन सध्या सुरू आहे. धोम धरणातील पाणीही आता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उरमोडी धरण वगळता इतर धरणांतील पाणी अत्यल्प उरले आहे. येरळवाडी धरणातील पाणी संपले आहे. प्रमुख धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले असल्याने उन्हाळी पिकांना फाटा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील धरणांतून नद्यांत पाणी सुटले तरच नदीकाठच्या पाणी योजना सुस्थितीत चालू राहणार आहेत. मात्र, धरणांतील आवर्तने कमी झाल्याने पाणी योजनाही धोक्यात आल्या आहेत. अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत आहे. काही गावांतील पाणी योजना बंद कराव्या लागल्या आहेत. तर बहुतांश गावांमध्ये एकाड-एक दिवस पिण्याचे पाणी सोडायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, धोम, कण्हेर या धरणांतून पूर्वेकडील तालुक्यांना पिण्यासाठी तसेच शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलेले आहे. मात्र हे पाणी शेवटपर्यंत पोहोचतच नाही, अशी स्थिती आहे. कालव्यांना जागोजागी गळती लागलेली आहे. कालव्यांच्या डागडुजीकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने ही वेळ आली आहे.
पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कालव्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील, अशी भीमगर्जना केली होती. त्यासाठी निधीही आला. काही ठिकाणी कामे सुरू झाली. मात्र ती केवळ मलमपट्टी ठरल्याचे समोर येत आहे. कालव्यांच्या डागडुजीसाठी आणलेला निधी कुठे मुरला? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.
कालव्यांतील पाणी बाजूच्या जमिनीमध्ये शिरून त्या जमिनी पडीक झाल्या आहेत. त्या जागांवर गाजरगवत माजले आहे. सतत पाणी साठून या जमिनी नापिक बनल्या आहेत. ही बाब एका बाजूला असताना ज्या जमिनीच्या सिंचनासाठी कालवे बांधले, त्या जमिनींपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने त्या तहानेने व्याकूळ झाल्या आहेत.
हजारो लिटर पाणी जातेय वाया
तापमान वाढल्याने धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यात कालव्यांना धरणाचे आवर्तन सोडल्यानंतर कालव्यांतूनही पाणी वाहून जाते. रोज हजारो लिटर पाणी वाया जात असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.