सातारा : शहरात सध्या पाणीटंचाई सुरू असताना काहीजण पाण्याचा अपव्यय करतात, अशा लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी गुरुवारपासून गांधीगिरी सुरू केली आहे. पहाटे उठून पाण्याची नासाडी करणाऱ्यांना ते गुलाबपुष्प देत आहेत. ‘आता तरी यापुढे पाणी काटसरीने वापरा,’ असा संदेश ते नागरिकांना देत आहेत. कासची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली असताना शहरात मात्र पाण्याची नासाडी होत आहे. अनेकवेळा नागरिकांना आवाहन करूनही त्यांच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय थांबवा, हे सांगण्यासाठी नगराध्यक्षांनी गांधीगिरी सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी सात ते नऊ यावेळेत नगराध्यक्ष विजय बडेकर, पाणीपुरवठा सभापती लीना गोरे आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात फेरफटका मारला. रस्त्यावर सडा मारणारे नागरिक, नळांना तोट्या न बसविल्यामुळे पाणी वाया घालविणारे नागरिक, रस्त्यावर पिण्याचे पाण्याने वाहने धुणारे नागरिक नगराध्यक्षांना आढळून आले. अशा लोकांना नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी गुलाबपुष्प दिले. न्यू इंग्लिश स्कूल चौक ते दत्तमंदिर चौक , सोमवार पेठ, पाचशे एक पाटी ते मोती चौक, पाचशे एक पाटी ते बारटक्के चौक, फुटका तलाव, सोन्या मारुती चौक परिसर या भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. महिला आणि पुरुषही यावेळी पाण्याचा अपव्यय करताना आढळून आले. यावेळी पालिकेचे कनिष्ठ अभियंता सुधीर चव्हाण, पाणीपुरवठा लिपिक संदीप सावंत तसेच या प्रभागातील नागरिक यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साताऱ्यात नगराध्यक्षांची गांधीगिरी
By admin | Updated: February 5, 2016 00:58 IST