मलकापुरात मित्रानेच मित्राला धारदार शस्त्राने भोकसले, उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 19:06 IST2025-11-02T19:06:03+5:302025-11-02T19:06:16+5:30
एकजण पोलिसांच्या ताब्यात!

मलकापुरात मित्रानेच मित्राला धारदार शस्त्राने भोकसले, उपचारादरम्यान मृत्यू
मलकापूर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राला धारदार शस्त्राने भोकसले. दारू पिल्यानंतर केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे-बेंगलुरु महामार्गालगत येथील रिलॅक्सबार समोर शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुदर्शन हणमंत चोरगे (रा. कोल्हापूरनाका, मलकापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर आदित्य देसाई असे संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर (ता. कराड) येथे पुणे-बंगळूर महामार्गालगत व्यंकटेश प्लाझा इमारत आहे. या इमारतीच्या गाळ्यात न्यू रिलॅक्स बार हे दारूचे दुकान आहे.
शनिवारी रात्री सुदर्शन चोरगे व आदित्य देसाई काही मित्रांसह तेथे दारू पीत बसले होते. यावेळी आदित्य व सुदर्शन यांच्यात शाब्दिक चकचमक झाली. दारू पिऊन सर्वजण बार समोरील जागेत आले. तेथेही पुन्हा त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी काही कळण्याअगोदरच आदित्य देसाई याने सुदर्शन चोरगे यांच्या पोटावर गुप्तीसारख्या शस्त्राने वार केले. त्यानंतरही कांहीकाळ संशयित आदित्य व मयत सुदर्शन हे मित्रांसोबत तेथेच गोंधळ घालत होते. सुदर्शन जमिनीवर कोसळल्यानंतर त्याला उपचारासाठी येथील कृष्णा रूग्णालयात दाखल केले.
उपचार सुरू असतानाच मध्यरात्रीनंतर रूग्णालयाकडून कराड शहर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. मात्र रविवारी सकाळी गंभीर जखमी सुदर्शनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तपासाची गतीने चक्रे फिरवत संशतिय आदित्य देसाईला सकाळी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.