ट्रक चालकाचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:12 IST2019-12-21T12:11:21+5:302019-12-21T12:12:31+5:30
ट्रक चालकाचे अपहरण करून लुटमार करणाऱ्या चौघांना शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक चाकू, दोन कोयत्यांसह कार जप्त करण्यात आली आहे.

ट्रक चालकाचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक
सातारा : ट्रक चालकाचे अपहरण करून लुटमार करणाऱ्या चौघांना शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक चाकू, दोन कोयत्यांसह कार जप्त करण्यात आली आहे. अजय गणेश अवतडे (वय २०), ऋतिक शिवाजी शिंदे (वय २०, रा. गोडोली सातारा), सनी सुरेश देशमुख (वय १९, रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मध्यप्रदेशातील एक ट्रक चालक दि. २० रोजी सायंकाळी पाच वाजता माल घेऊन फलटणकडे निघाला होता. यावेळी वाढे फाटा परिसरात चारचाकी आडवी मारून वरील संशयितांनी ट्रक थांबविला. त्यानंतर ट्रक चालक राघवेंद्रसिंह श्रीमोहनसिंह (रा. मध्यप्रदेश) याचे शस्त्राचा धाग दाखवून त्यांनी कारमधून अपहरण केले.
या प्रकाराची माहिती शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचा गुन्हे प्रकटीकरणला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ वाढे फाटा येथे धाव घेतली.
पोलिसांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता संबंधित संशयितांनी तीन हजार रुपये आणि मोबाइल हिसकावून घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिघांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. मात्र, त्यांचा आणखी एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू मुलाणी, पोलीस नाईक सुजीत भोसले, हसन तडवी, ओंकार यादव यांनी ही कारवाई केली.